श्लोक २२ वा
बन्धूनां नष्टगोत्राणामर्जुनः सांपरायिकम् ।
हतानां कारयामास, यथावदनुपूर्वशः ॥२२॥
यादव निमाले कुळवंशेंसीं । गोत्रज नाहीं कर्मांतरासी ।
वज्र राहिला द्वारकेसी । ते विधी अर्जुनासी करणें पडली ॥८४॥
’मी पावलों निष्कर्म ब्रह्म । तो मी न करीं अंत्येष्टीकर्म’ ।
ऐसा ज्ञानगर्वोपक्रम । तोही सूक्ष्म भ्रम अर्जुनीं नाहीं ॥८५॥
’कर्मण्यकर्म यः पश्येत्’ । हा अर्जुनास बाणला पूर्णदंश ।
तेणें तो अंत्येष्टीकर्मास । स्वयें सावकाश करिता जाहला ॥८६॥
प्रथम ज्येष्ठांचें दहन । पाठीं कनिष्ठांचे जाण ।
तैसेंचि करी पिंडदान । तिळतर्पण सर्वांचें ॥८७॥
उत्तरक्रिया करुनि संपूर्ण । द्वारकेसी आला अर्जुन ।
तेथेंही वर्तलें आने आन । समुद्र दारुण क्षोभला ॥८८॥