श्लोक ४६ वा
वेदोक्तमेव कुर्वाणो निःसङ्गोऽर्पितमीश्वरे ।
नैष्कर्म्यां लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः ॥४६॥
दासी स्वामीची आज्ञाधारी । कां राजमुद्रा प्रजांवरी ।
तैसी वेदाज्ञा जो शिरीं धरी । स्वधर्माचारी निष्काम ॥७९२॥
मी एकु कर्मकर्ता । ऐशी उठों नेदी अहंता ।
तें कर्मचि स्वभावतां । अर्पी श्रीअनंता ईश्वरातें ॥७९३॥
एवं ईश्वरीं जें अर्पे कर्म । तें कर्म होय निर्धर्म ।
याचि नांव परम । ’नैष्कर्म्य’ निजसिद्धी ॥७९४॥
वेदें बोलिलें कर्मफळ । ज्याची वासना निष्काम निर्मळ ।
त्यासि वेदोक्त फळ प्रबळ । भोगावया केवळ स्वप्नीं न दिसे ॥७९५॥
ऐसें असतां कर्मफळ । वांछितां नाडिजे केवळ ।
जेवीं परिसु देऊनि सोज्ज्वळ । मागिजे पोफळ तांबूलासी ॥७९६॥
कमा निष्कामता नित्य फळ । तेथ फळाशा नाडले सकळ ।
चंदन सर्वांगीं सफळ । तेथ मागतां फळ नाडिजे स्वयें ॥७९७॥
हातीं आंतुडावया मासा । गळीं लाविजे अल्प आमिषा ।
तेवीं निष्काम करावया मानसा । वेदु फळाशा प्रलोभी ॥७९८॥
आमिष घालूनि मासे पाळी । कीं तद्योगें जळाबाहेर गाळी ।
तेवीं कर्म कर्मातें निर्दाळी । हें नेणिजे मुळीं फळकामीं ॥७९९॥
हो कां फळाचिये चाडे । स्वधर्मकर्मीं प्रवृत्ति घडे ।
तेणें नैष्कर्म्यसिद्धि आंतुडे । हें वेदांचें फुडें निजगृह्य ॥८००॥
कर्म ब्रह्मत्वें सदा सफळ । फळ वांच्छी त्यातें निष्फळ ।
हें जाणोनि कर्मकुशळ । फळाशा समूळ छेदिती ॥८०१॥
ऐसें आचरतां वैदिक कर्म । तेणें कर्में पाविजे नैष्कर्म्य ।
याहोनियां अति सुगम । सांगेन वर्म तें ऐक ॥८०२॥