श्लोक ५ व ६ वा
भूम्यंब्वग्न्यनिलाकाशा भूतानां पञ्च धातवः ।
आब्रह्मस्थावरादीनां शारिरा आत्मसंयुताः ॥५॥
वेदेन नामरूपाणि विषमाणि विषमाणि समेष्वपि ।
धातुषृद्धव कल्प्यन्ते एतेषां स्वार्थसिद्धये ॥६॥
पृथ्वी आप तेज वायु गगन । ब्रह्मादि स्थावरान्त जाण ।
भूतीं पंचभूतें समान । वस्तुही आपण सम सर्वीं ॥६४॥
नाहीं नाम रूप गुण कर्म । ऐसें जें केवळ सम ।
तेथ माझेनि वेदें विषम । केलें रूप नाम हितार्थ ॥६५॥
तळीं पृथ्वी वरी गगन । पाहतां दोनीही समान ।
तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देशांतरगमनसिद्ध्यर्थ ॥६६॥
तेवीं नाम रूप वर्णाश्रम । समाच्या ठायीं जें विषम ।
हा माझेनि वेदें केला नेमे स्वधर्मकर्मसिद्ध्यर्थ ॥६७॥
येणेंचि द्वारें सुलक्षण । धर्मार्थकाममोक्षसाधन ।
पुरुषांच्या हितालागीं जाण । म्यां केलें नियमन वेदाज्ञा ॥६८॥
रूप नाम आश्रम वर्ण । वेदु नेमिता ना आपण ।
तैं व्यवहारु न घडता जाण । मोक्षसाधन तैं कैंचें ॥६९॥
एवं वेदें चालवूनि व्यवहारु । तेथेंचि परमार्थविचारु ।
दाविला असे चमत्कारु । सभाग्य नरु तोचि जाणे ॥७०॥
अत्यंत करिता कर्मादरु । तेणें कर्मठचि होय नरु ।
तेथ परमार्थ नाहीं साचारु । विधिनिषेधीं थोरु पीडिजे ॥७१॥
केवळ स्वधर्मकर्म सांडितां । अंगीं आदळे पाषंडता ।
तेणेंही मोक्ष न ये हाता । निजस्वार्था नागवले ॥७२॥
यालागीं स्वधर्म आचरतां । निजमोक्ष लाभे आइता ।
हे वेदार्थाची योग्यता । जाणे तो ज्ञाता सज्ञान ॥७३॥
हे वेदार्थनिजयोग्यता । सहसा न ये कवणाचे हाता ।
याचिलागीं गा परमार्थ । गुरु तत्त्वतां करावा ॥७४॥
त्या सद्गुरूची पूर्ण कृपा होय । तरीच आतुडे वेदगुह्य ।
गुरुकृपेवीण जे उपाय । ते अपाय साधकां ॥७५॥
यालागीं माझा वेद जगद्गुरु । दावी आपातता व्यवहारु ।
नेमी स्वधर्मकर्मादरु । जनाचा उद्धारु करावया ॥७६॥
ऐसा माझा वेदु हितकारी । दावूनि गुणदोष नानापरी ।
जन काढी विषयाबाहेरीं । वेद उपकारी जगाचा ॥७७॥