श्लोक ३२ वा
आज्ञायैवं गुणान् दोषान् मयादिष्टानपि स्वकान् ।
धर्मान् सन्त्यज्य यः सर्वान् मां भजेत स तु सत्तमः ॥३२॥
प्रपंचनगरासभोंवतीं । कर्मनदीची महाख्याती ।
तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्तिस्थिति अरतीरीं ॥५३॥
ते नदीचेनि जीवनमेळें । कर्मासी येती कर्मफळें ।
स्वर्गनरकादि सोहळे । तेणें जळबळें भोगिती ॥५४॥
प्रपंचनगरींहूनि निघतां । वेगें परमार्थासी येतां ।
जो तो कर्मनदीआंतौता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥५५॥
एक तरलों ऐसें ज्ञाते म्हणती । तेही कर्मीं कर्मगुचकिया खाती ।
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । तरलों म्हणती तोंडाळ ॥५६॥
ऐसे बुडाले नेणों किती । बुडतां शिकवण तेचि देती ।
कर्मचि उपावो तरणोपायप्राप्ती । म्हणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥
न कर्मणा हें वेदवचन । कर्मे नव्हे ब्रह्मज्ञान ।
तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥५८॥
कर्म देहाचे माथां पूर्ण । तो न सांडितां देहाभिमान ।
कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥५९॥
एक अरतीरीं असती नष्ट । तरलों म्हणती अकर्मनिष्ठ ।
स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषांडी ॥१०६०॥
ये कर्मनदीतें तरला । ऐसा न देखों दादुला ।
बुडाल्या धुराचि मुदला । पाडु केतुला इतरांचा ॥६१॥
ये कर्मनदीची उत्पत्ती । मजचिपासोनि निश्चितीं ।
तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधें ॥६२॥
आज्ञायैवं हें मूळींचें मूळ । श्लोकींचें प्रथम पद केवळ ।
येणेंचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सांगत ॥६३॥
मदाज्ञा मेघगंभीरा । निःश्वसितपवनद्वारा ।
चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥६४॥
तेणें कर्मनदीआंतौतें । अनिवार उधळले भरतें ।
पूर दाटला जेथींचा तेथें । उतार कोणातें कळेना ॥६५॥
तेथ गुणदोषांचा वळसा । विधिनिषेधांचा धारसा ।
कर्माकर्मांचा आवर्तं कैसा । सबाह्य सरिसा भंवतसे ॥६६॥
संकल्पविकल्पांचे हुडे । नदी दाटली चहूंकडे ।
तरों जाय तो गुंतोनि बुडे । पाऊल पुढें न घालवे ॥६७॥
प्रत्यवायाची मगरमिठी । पडल्या सगळेंचि घाली पोटीं ।
उगळोनि न सोडी संकटी । ने उठाउठीं अधोगती ॥६८॥
अंगविकळतेचे मासे । तळपताती घ्यावया आविसें ।
कर्मठतेचे कमठ कैसे । खडक तैसे निबर ॥६९॥
काळविक्षेप सर्पासी । एक सांपडिले विलासआळशीं ।
विकल उच्चार चोंढियेसी । एक व्यग्रतेसीं बुडाले ॥१०७०॥
एक तरावयाच्या आशा । पडिले कर्माच्या धारसां ।
ते विधिनिषेधवळसां । पडिले सहसा नुलंडती ॥७१॥
एक स्वकर्मधारीं । पडोनि वाहावले दूरी ।
ते सत्यलोकमगरीं । आपुल्या विवरीं सूदले ॥७२॥
एकां न वचवेचि परतटीं । माझारींचि फळें गोमटीं ।
देखोनि धांविन्नले अव्हाटीं । ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥
आम्ही तरों युक्तीबळें । म्हणोनि रिघाले एके वेळे ।
ते अहंकारखळाळें । महातिमिंगिळें गिळिले ॥७४॥
एकीं वेदत्रयाची पेटी । दीक्षेची दोरी बांधली पोटीं ।
ते स्वर्गांगनाकुचकपाटीं । गुंतोनि शेवटीं बुडाले ॥७५॥
मंत्रतंत्रादिदीक्षितें । गुंतोनि बुडालीं जेथींच्या तेथें ।
कर्मनदीच्या परपारातें । कोणी पावतें दिसेना ॥७६॥
विरळा कोणीएक सभाग्य येथें । हे सकळ उपाय सांडूनि परते ।
जो अनन्य प्रीतीं भजे मातें । कर्मनदी त्यातें कोरडी ॥७७॥
माझे भक्तीचें तारूं नातुडे । जंव सप्रेमाचें शीड न चढे ।
तंव तरणोपाय बापुडे । वृथा कां वेडे शिणताती ॥७८॥
धरूनि अनन्यभक्तीचा मार्गु । करूनि सर्वधर्मकर्मत्यागु ।
हा तरणोपाय चांगु । येरु तो व्यंगु अधःपाती ॥७९॥
नेणोनि स्वधर्मकर्मांतें । कां नास्तिक्य मानूनि चित्तें ।
किंवा धरोनियां आळसातें । त्यागी कर्मातें तैसा नव्हे ॥१०८०॥
अथवा शरीरक्लेशाभेण । किंवा सर्वथा उबगोन ।
कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण सांडीना ॥८१॥
माझी वेदरूप आज्ञा शुद्ध । ते वेदविवंचना विशद ।
स्वधर्मकर्मांचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ॥८२॥
स्वधर्माचा उत्तम गुण । प्रत्यवायें अधःपतन ।
या दोहींतें जाणोन । मद्भक्तीसी प्राण विकिला ॥८३॥
विसरोनि आन आठवण । अखंडता हरिस्मरण ।
त्या नांव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥८४॥
माझेनि भजनप्रेमें जाण । विसरला कर्माची आठवण ।
कर्म बापुडें रंक कोण । बाधक जाण नव्हे भक्तां ॥८५॥
सप्रेम करितां भजनविधी । सर्व कर्मांतें विसरली बुद्धी ।
ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥८६॥
ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी ।
ज्याची श्रद्धा श्रीधरीं । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥८७॥
जो जीवेंप्राणें भक्तीसी विकिला । तो तेव्हांचि कर्मावेगळा जाला ।
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मीं बांधला केवीं जाये ॥८८॥
गुणदोषांची जननी । ते निःशेष अविद्या निरसूनी ।
जो प्रवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानीं मस्तकीं ॥८९॥
निजकल्पना जे देहीं । तेचि मुख्यत्वें अविद्या पाहीं ।
ते कल्पना निमालिया ठायीं । जगीं अविद्या नाहीं निश्चित ॥१०९०॥
अविद्येच्या त्यागासवें । धर्माधर्मादि आघवें ।
न त्यजितांचि स्वभावें । त्याग फावे अनायासें ॥९१॥
शिर तुटलियापाठीं । शरीर निजकर्मासी नुठी ।
तेवीं अविद्या त्यागितां शेवटीं । त्यजिले उठाउठीं सर्व धर्म ॥९२॥
दिवसा चंद्रउदयो पाहे । तो झाला तैसा नाहीं होये ।
तेवीं अविद्येचेनि विलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥९३॥
खद्योत सूर्योदयापाठीं । शोधूनि पाहतां न ये दिठीं ।
तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥९४॥
ग्रहगण नक्षत्रमाळा । खद्योततेजउमाळा ।
रात्रीसकट बोळवण सकळां । तेवीं धर्माधर्मकळा अविद्येसवें ॥९५॥
सर्व धर्मत्यागाची खूण । उद्धवा मुख्यत्वें हेचि जाण ।
याहीवरी माझें भजन । मुख्य भागवतपण या नांव ॥९६॥
म्हणसी अविद्याचि केवीं नासे । मा अधर्म नासती तीसरिसे ।
ते अविद्या नाशे अनायासें । भक्तिउल्हासें माझेनि ॥९७॥
सूर्योदय देखतां दृष्टीं । सचंद्र नक्षत्रांची मावळे सृष्टी ।
तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं । अविद्या उठाउठीं निमाली ॥९८॥
अविद्येच्या नाशासवें । नासती धर्माधर्म आघवे ।
जेवीं गरोदर मारितां जीवें । गर्भही तीसवें निमाला ॥९९॥
जेव्हां माझे भक्तीचा उल्हासू । तेव्हांचि अविद्येचा निरासू ।
अविद्ये सवें होय नाशू । अनायासू सर्व धर्मां ॥११००॥
ते तूं भक्ति म्हणसी कोण । जिचें मागां केलें निरूपण ।
ते माझी चौथी भक्ति जाण । अविद्यानिरसन तिचेनि ॥१॥
येर आर्त जिज्ञासु अर्थार्थी । जे जे भक्तींतें आदरिती ।
ते अविद्यायुक्त निश्चितीं । चौथी भक्ति मुख्यत्वें माझी ॥२॥
जे भक्तीमाजीं कंहीं । अविद्येचा विटाळू नाहीं ।
भजन तरी ठायींच्या ठायीं । अनायासें पाहीं होतसे ॥३॥
ते माझी आवडती भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं ।
जिसी अविद्या असे धाकती । सर्व धर्म कांपती सर्वदा ॥४॥
ते भक्तीची देखोनि गुढी । अविद्या धाकेंचि प्राण सांडी ।
सर्व धर्मांची आवडी । घायेंवीण बापुडी निमाली ॥५॥
हा मद्भक्तीचा पर्यावो । आवडीच्या गोडिया सांगे देवो ।
ऐक भक्ताचा भजनभावो । जेणें निर्वाहो भक्तीचा ॥६॥
माझेनि अनुसंधानेंवीण । स्नान संध्या जप होम दान ।
ते अवघेचि अधर्म जाण । मद्भजन तें नव्हे ॥७॥
गोडी आवडी ते परपुरुषीं । मिथ्या लुडबुडी निजपतीपाशीं ।
ते पतिव्रता नव्हे जैसी । जाण भक्ति तैसी व्यभिचारी ॥८॥
नाना विषयीं ठेवूनि मन । जो करी ध्यान अनुष्ठान ।
ते जारस्त्रियेच्या ऐसें जाण । नव्हे पावन ते भक्ती ॥९॥
काया वाचा मनसा । माझे भक्तीचा पडला ठसा ।
भजतां नाठवे दिवसनिशा । भक्तीची दशा या नांव ॥१११०॥
जपेंवीण नाम वदनीं । धारणेवीण ध्यान मनीं ।
संकल्पेंवीण मदर्पणीं । सर्व कर्में करूनी सर्वदा ॥११॥
निरोधेंवीण वायुरोधू । मर्यादेवीण स्वरूपबोधू ।
विषयेंवीण सदा स्वानंदू । मद्भक्त शुद्धू या नांव ॥१२॥
भक्त म्हणवितां गोड वाटे । परी भजनमार्गीं हृदय फुटे ।
अकृत्रिम भक्ति जैं उमटे । तैं मी भेटें उद्धवा ॥१३॥
ऐसेनि भजनें जो भजत । तो मजमाजीं मी त्याआंत ।
भक्तांमाजीं जो उत्तम भक्त । साधु निश्चित या नांव ॥१४॥
तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । साधूमाजीं अतिउत्तम ।
तो माझें विश्रामधाम । अकृत्रिम उद्धवा ॥१५॥
तयालागीं मी आपण । करीं सर्वांगाचें आंथरुण ।
जीवें सर्वस्वें निंबलोण । प्रतिपदीं जाण मी करीं ॥१६॥
तो मज आवडे म्हणसी कैसा । जीवासी पढिये प्राण जैसा ।
सांगतां उत्तम भक्तदशा । प्रेमपिसा देवो जाला ॥१७॥
मग न धरतु न सांवरतु । उद्धवासी कडिये घेतु ।
भुलला स्वानंदें नाचतु । विस्मयें स्फुंदतु उद्धवू ॥१८॥
मी एकु देवो हा एकु भक्तु । हेंही विसरला श्रीकृष्णनाथु ।
हा देवो मी एकु भक्तु । तें उद्धवाआंतु नुरेचि ॥१९॥
ऐसे भक्तिसाम्राज्यपटीं । दोघां पडली ऐक्यगांठी ।
तंव देवोचि कळवळला पोटीं । निजभक्तगोठी सांगावया ॥११२०॥
ऐसी उत्तम भक्तांची कथा । अतिशयें आवडे कृष्णनाथा ।
रुचलेपणें तत्त्वतां । मागुतां मागुतां सांगतू ॥२१॥
श्लोकीं प्रमेयें दिसतां अनेगें । तें श्रीकृष्णें सांडूनि मागें ।
हा ग्रंथार्थु श्रीरंगे । साक्षेपें स्वांगें लिहविला ॥२२॥
हे माझे युक्तीची कथा । नव्हे नव्हे जी सर्वथा ।
सत्य मानावें श्रोतां । ये अर्थींचा वक्ता श्रीकृष्ण ॥२३॥
श्रोतां व्हावें सावधान । मागील कथा अनुसंधान ।
दोघां पडिलें होतें आलिंगन । विस्मयें पूर्ण उद्धवू ॥२४॥
चढत प्रेमाचें भरतें । तें आवरोनि कृष्णनाथें ।
थापटूनि उद्धवातें । सावध त्यातें करी हरी ॥२५॥
उद्धवातें म्हणे तत्त्वतां । तुज आवडली भक्तिकथा ।
तेचि मी सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥२६॥
एक जाणोनि भजती मातें । एक ते केवळ भावार्थें ।
मी दोहींच्या भुललों भावातें । दोघे मातें पढियंते ॥२७॥