श्लोक ३७ वा
उद्धव उवाच -
विद्रावितो मोहमहान्धकारो, य आश्रितो मे तव संनिधानात् ।
विभावसोः किन्नु समीपगस्य, शीतं तमो भीः प्रभवन्त्यजाद्य ॥३७॥
जो सकळदेवचूडामणी । जो यादवांमाजीं अग्रगणी ।
जो अविद्यारात्रीचा तरणी । जो शिरोमणी ब्रह्मवेत्त्यां ॥७३॥
ऐशिया श्रीकृष्णाप्रती । स्वानंदाचिये निजस्फूर्ती ।
उद्धवें सांगतां निजस्थिती । त्यामाजीं करी स्तुती आद्यत्वें हरीची ॥७४॥
मज तंव विचारितां । ब्रह्मा सर्वांचा आदिकर्ता ।
तोही नारायणनाभीं तत्त्वतां । होय जन्मता ’अज’ नामें ॥७५॥
तो तूं कमळनाभि नारायण । मायासंवलित ब्रह्म जाण ।
ते मायेचें तूं आद्यकारण । आद्यत्व पूर्ण तुज साजे ॥७६॥
अविद्येच्या महारात्रीं । अडकलों होतों मोहअंधारीं ।
तेथूनि काढावया बाहेरीं । आणिकांची थोरी चालेना ॥७७॥
तेथ तुझेनि वचनभास्करें । नासोनि शोकमोह अंधारें ।
मज काढिलें जी बाहेरें । चमत्कारें संनिधीं तुझ्या ॥७८॥
तुझिये संनिधीपाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ।
तेथ मोहममता कैसी ग्रासी । हृषीकेशी तुज असतां ॥७९॥
अंधारी राती अतिगहन । तेथ शीतें पीडिला जो संपूर्ण ।
त्यासी आतुडलिया हुताशन । शीत तम जाण तत्काळ पळे ॥६८०॥
तो अग्नि सेवितां स्वयें सदा । शीततमांची भयबाधा ।
पुढती बाधों न शके कदा । तेवीं गोविंदा संनिधीं तुझ्या ॥८१॥
तेवीं शोकमोहममतेशीं । माया जन बांधे भवपाशीं ।
ते तुझिये संनिधीपाशीं । जाती आपैसीं हारपोनी ॥८२॥
मरणजन्मां अपाये । मागां अनेक सोशिले स्वयें ।
ज्यासी तुझी संनिधि होये । त्यासी तें भवभये समूळ मिथ्या ॥८३॥
तुझे संनिधीपाशीं जाण । समूळ मायेचें निर्दळण ।
तेचि अर्थीचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥८४॥