श्लोक १६ वा
अहोरात्रैश्छिद्यमानं, बुद्धावायुर्भयवपेथुः ।
मुक्तसङगः परं बुद्धवां, निरीह उपशाम्यति ॥१६॥
अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग ।
हां जाण नीच नवा रोग । अंगीं साङग लागला ॥५९॥
काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु ।
जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥१६०॥
जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान ।
साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥६१॥
न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण ।
तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥६२॥
वैराग्ययुक्त करितां भक्ती । होय देहाभिमानाची निवृत्ती ।
तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥६३॥
ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती ।
निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥६४॥
ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले ’परमसुख’ ।
हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥६५॥