श्लोक २९ वा
ता ये श्रृण्वन्ति गायन्ति, ह्यमुमोदन्ति चादृताः ।
मत्पराः श्रद्दधानाश्च, भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥२९॥
आपुलिया गृहकार्यार्था । विषयव्यापारीं जातां जातां ।
कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥७२॥
कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें ।
भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥७३॥
जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी ।
तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥७४॥
ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु ।
कथावधानीं धरितां धीरु । हर्षें निर्भरु नर होय ॥७५॥
जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनीं प्रीति वाढे ।
वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथ कैवाडें स्वयें गाय ॥७६॥
फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे ।
न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥७७॥
निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता ।
तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥७८॥
जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे ।
प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निजश्रद्धा ॥७९॥
कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं ।
बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥३८०॥
न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान ।
येणेंचि आम्ही जाऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥८१॥
एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्वास धरितां चित्तीं ।
भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥८२॥
ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं ।
सर्वथा स्वयें करणें नाहीं । ’मत्पर’ पाहीं या रीतीं ॥८३॥
ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती ।
तेणें उपजे ’चौथी भक्ती’ । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥८४॥
तेथ न करितां आठवण । अखंड होय हरीचें स्मरण ।
क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥८५॥;
जें जें ’दृष्टीं’ देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान ।
तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥८६॥;
जें जें ’वाचा’ वदे वचन । तें तें होय हरीचें स्तवन ।
स्तव्य स्तविता उणखून । हेही आठवण विसरोनी ॥८७॥
शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरुपें हरीची सत्ता ।
शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥८८॥
यापरी ’शब्दश्रवण’ । श्रवणीं श्रवण होतां जाण ।
तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥८९॥;
’गंध’ घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी ।
तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें॥३९०॥;
’रस’ रसना रसत्वबोध । तेथ निजभोक्ता गोविंद ।
तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥९१॥;
’शीत-उष्ण-मृदु-कठीण’ । निजांगीं लागतां जाण ।
तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥९२॥;
’करां’ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता ।
यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥९३॥;
निश्चल निजरुपावरी । चपळ पाउलांच्या हारी ।
चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥९४॥;
जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती ।
चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव ’मद्भक्ति’ उद्धवा ॥९५॥;
हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत ’चौथी’ ।
हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥९६॥