श्लोक १० वा
स्यान्नस्तवाङ्घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः ।
यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिः । व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥१०॥
आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु ।
तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥
पापइंधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु ।
लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥
ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता ।
तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥
तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें ।
तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥
करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान ।
त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥
तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती ।
पूजिला जी श्रीपती । चतुर्मूती व्यूहरूपें ॥१६॥
'वासुदेव' 'संकर्षण' । 'अनिरुद्ध' आणि 'प्रद्युम्न' ।
हाचि चतुर्व्यूह जाण । पूजास्थान भक्तांचें ॥१७॥
भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपीं एक मूर्ती ।
ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । 'व्यूहस्थिति' त्या नांव ॥१८॥
'सात्वत' म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐश्वर्यातें वांछित ।
चतुर्व्यूहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥१९॥
जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया एक भक्तीं ।
पूजा कीजे चतुर्मुर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२०॥
त्रिषवण* त्रिकाळ । पूजा करितां अविकळ । [*तीन सवने]
भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥२१॥
आणिकही भक्तजन । तुझें करिताति भजन ।
यज्ञद्वारा होमहवन । विधि विधान वेदोक्त ॥२२॥