श्लोक ३० वा
त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् ।
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥३०॥
तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण ।
त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥
तूं देहीं वर्तसी विदेहस्थिती । तूज विषय आतळूं न शकती ।
हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तूज झाली ॥१२॥
तूज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड ।
दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥
ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधू दीनदयाळू ।
निजात्मभावें तूं केवळू । भक्तवत्सलू भावार्थे ॥१४॥
ऐसा यदूचा संवादू । आवडीं सांगे गोविंदू ।
उद्धवासी म्हणे सावधू । हृदयीं बोधू धरावा ॥१५॥