श्लोक २६ वा
स लीयते महान्स्वेषु गुणेषु गुणवत्तमः ।
तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥२६॥
तेंही महत्तत्त्व येथें । कारणगुणीं लीन होतें ।
तेंही गुणसाम्यें निश्चितें । पावे लयाते अव्यक्तीं ॥५५०॥
आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ ।
उरे बीजमात्र अवशेषित । त्या नांव अव्यक्त बोलिजे ॥५१॥
वटाचा आकारविकार । ना शेंडा मूळ पुष्प पत्र ।
उरे अवशेष बीजमात्र । तेवीं संसार अव्यक्तीं ॥५२॥
वटबीज उरलें येथ । तें दृष्टीसी तर्केना निश्चित ।
तेवीं भवबीज जें अव्यक्त । तें नव्हे व्यक्त जीवासी ॥५३॥
नाना तृणजातिबीज गहन । उष्णकाळीं काळ करी लीन ।
तेवीं भवबीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसीं ॥५४॥
पूर्वी काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केलें व्यक्त ।
तेचि काळयोगें अव्यक्त । सुलीन होत काळेंसीं ॥५५॥
या नांव अव्यक्ताचा पहा हो । काळामाजीं बोलती लयो ।
काळ बोलिजे महाबाहो । त्याचा होय व्ययो पुरुषेंसीं ॥५६॥;