श्लोक १६ वा
ये कैवल्यमसंप्राप्ता ये चातीताश्च मूढताम् ।
त्रैवर्गिका ह्यक्षणिका आत्मानं घातयन्ति ते ॥१६॥
सज्ञानी स्वतां तरती । अज्ञानी सज्ञानां शरण येती ।
तेणें त्यांसी कैवल्यप्राप्ती । त्यांच्या वचनोक्तिविश्र्वासें ॥८३॥
जे अज्ञान ना सज्ञान । ज्यांसी केवळ ज्ञानाभिमान ।
ज्यांचें विषयीं लोलुप मन । ते पुरुष जाण आत्मघाती ॥८४॥
साधावया अर्थ काम । जे करिती अभिचारधर्म ।
हें त्रैवर्णिक घोर कर्म । आत्मघाती परम ज्याचें त्यासी ॥८५॥
देहाचिया गोमटिया । जे करिती अभिचारक्रिया ।
तेणें कर्में आपआपणियां । सृजिला राया निजघातु ॥८६॥
जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडे बुडीं ।
तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडीं अधःपात ॥८७॥