श्लोक १५ वा
द्रव्यैः प्रसिद्धैर्मद्यागः, प्रतिमादिष्वमायिनः ।
भक्तस्य च यथालब्धैर्हृदि भावेन चैव हि ॥१५॥
पूजक सकाम होय चांग । तैं पूजाद्रव्य व्हावें साङग ।
पूजासाधन झालिया व्यंग । फळ निर्व्यंग उपजेना ॥२३॥
भक्त निष्काम वाडेंकोडें । तैं पूजाद्रव्याचें सांकडें ।
सर्वथा कांहीं न पडे । भक्तभाव आवडे भगवंता ॥२४॥
तेथ अनायासें जें प्राप्त । तेणें भगवंत होय तृप्त ।
तोचि पूजायाग यथोक्त । जाण निश्चित उद्धवा ॥२५॥
निष्कामवृत्तीं फल मूल । दूर्वांकुर कां निर्मळ जळ ।
इतकेन पूजायाग सकळ । होय अविकळ मद्भावें ॥२६॥
जेथ माझा सद्भाव दृढ । तेथ उपचारांचा कोण पाड ।
भक्तांचा भावचि मज गोड । तेणें सुख सुरवाड मद्भक्तां ॥२७॥
बाह्य उपचार जे कांहीं । ते प्रतिमामूर्तिपूजेसी पाहीं ।
मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाहीं उपचारां ॥२८॥
तेथ मनचि होय माझी मूर्ती । मनोमय उपचारसंपत्ती ।
निर्लोभें जें मज अर्पिती । तेणें मी श्रीपती संतुष्ट ॥२९॥
प्रतिमादि अष्टौ पूजास्थान । यथोक्त पूजेचें विधान ।
तुज मी साङग सांगेन । ऐक सावधान उद्धवा ॥१३०॥