श्लोक ३८ व ३९ वा
विषयाभिनिवेशेन नात्मानं यत्स्मरेत्पुनः ।
जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥३८॥
जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद ।
विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥३९॥
विषयाभिनिवेशें मन । ज्या स्वरुपाचें करी ध्यान ।
तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥३६॥
तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें ।
निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥३७॥
ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥३८॥
जेव्हां चेतना जाय सप्राण । तेव्हां देहासी ये प्रेतपण ।
त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥३९॥
स्नेहें द्वेषें अथवा भयें । अंतकाळीं जें ध्यान राहे ।
पुरुष तद्रूपचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥४४०॥
भरत करितां अनुष्ठान । अंतीं लागलें मृगाचें ध्यान ।
तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरुपें मन जन्म पावे ॥४१॥
भयास्तव भृंगाचें ध्यान । कीटकी करितां जाण ।
ते तद्रुप होय आपण । ध्यानानुरुपें मन जन्म पावे ॥४२॥
द्वेषें ध्यातां श्रीकृष्णासी । तद्रूपता झाली पौण्ड्रकासी ।
जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी ॥४३॥
वाढवूनियां संभ्रम । अंतकाळीं आवडे सप्रेम ।
जेथें ध्यान ठसावे मनोरम । तेंचि जन्म पुरुषासी ॥४४॥
मग तेणें ध्यानानुभवें । जैसा कांहीं आकारु संभवे ।
तेथ देहाभिमान पावे । ’हें मी आघवें’ म्हणोनी ॥४५॥
येथ मन आणि अभिमान । स्वरुप एक कार्यें भिन्न ।
हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥४६॥
दैवयोगें त्या देहाचें । बरवें वोखटें घडे साचें ।
तैं अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥४७॥
परी हें देह नव्हे आन । हेंही स्मरेना तें मन ।
पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥४८॥
येचि अर्थीचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ ।
जेवीं स्वप्न आणि मनोरथ । विसरवित निजदेहा ॥४९॥
स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वप्नीं होय अमरनाथ ।
मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥४५०॥
तें दरिद्रदेह माझें गेलें । हें अमरदेह प्राप्त झालें ।
ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥५१॥
मजूर राउळींचें घृत नेतां । तो तुरुंगीं चढे मनोरथा ।
मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥५२॥
सबळ वारुचें उड्डाण । म्हणूनि उडूं जातां आपण ।
पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥५३॥
बळें उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा ।
बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥५४॥
येथवरी तीव्र जें विस्मरण । त्या नांव देहाचें मरण ।
अतिउद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥५५॥
एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचें लक्षण ।
तेचि अर्थींचें निरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५६॥;