श्लोक १२ वा
ता नाविदन् मय्यनुषङ्गबद्ध धियः स्वमात्मानमदस्तथेदम् ।
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्यः प्रविष्टा इव नामरूपे ॥१२॥
मज गोकुळीं असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता ।
हे अवघी समूळ कथा । तुज म्यां तत्त्वतां सांगीतली ॥७४॥
ऐसियांसी म्यां अतिनिचाडतां । कृतघ्नाचे परी सांडूनि जातां ।
माझ्या वियोगकाळींची व्यथा । पाषाण पाहतां उतटती ॥७५॥
यापरी मजवेगळ्या असतां । मागें माझी कथा वार्ता ।
सदा माझें स्मरण करितां । मदाकारता पावल्या ॥७६॥
करितां दळणकांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
कीं आदरिल्या दधिमंथन । माझें चरित्रगायन त्या करिती ॥७७॥
करितां सडासंमार्जन । गोपिकांसी माझें ध्यान ।
माझेनि स्मरणें जाण । परिये देणें बालकां ॥७८॥
गायीचें दोहन करितां । माझे स्मरणीं आसक्तता ।
एवं कर्मीं वर्तता । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥७९॥
करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करितां मद्ध्यान तयांसी ॥१८०॥
एवं मज गेलियापाठीं । ऐसी माझी आवडी मोठी ।
अखंड माझ्या ठायीं दृष्टीं । माझ्याचि गोष्टी सर्वदा ॥८१॥
ऐसी अनन्य ठायींच्या ठायीं । गोपिकांसी माझी प्रीती पाहीं ।
त्या वर्ततांही देहगेहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥८२॥
यापरी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्रभ्रतार । निजव्यापार विसरल्या ॥८३॥
विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासें ॥८४॥
जेणें देहें पतिपुत्रांतें । आप्त मानिलें होतें चित्तें ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनी ॥८५॥
विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझें ध्यानसुख भोगितां ॥८६॥
निरसोनि तत्त्वांचे विकार । समाधि पावे मुनीश्वर ।
तो विसरे जेवीं संसार । तेवीं मदाकार गोपिका ॥८७॥
जेवीं कां नाना सरिता । आलिया सिंधूतें ठाकितां ।
तेथें पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥८८॥
तेवीं गोपिका अनन्यप्रीतीं । माझी लाहोनियां प्राप्ती ।
नामरूपाची व्युत्पत्ती । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥८९॥
सच्चिदानंदस्वरूपप्रभावो । नेणतां माझा निजस्वभावो ।
गोपिकांचा अनन्यभावो । परब्रह्म पहा वो पावल्या ॥१९०॥