श्लोक ४ था
एलेः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः ।
उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥४॥
समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती ।
पुरुरवा चक्रवर्ती । ज्याची ख्याती पुराणीं ॥४९॥
तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य ।
महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरुरवा ॥५०॥
राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती ।
ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥५१॥
प्राणान्तेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण ।
गायीलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥५२॥
ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं ।
भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥५३॥
तेणें अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥५४॥
विसरोनि निजमहत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी ।
काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥५५॥
ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती ।
हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥५६॥
उर्वशीपुरुरव्याचा संबंध। नवम स्कंधीं असे विशद ।
तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथाअनुवाद न करीच ॥५७॥
पूर्वकथासंबंधः ॥ ॥ उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण ।
तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥५८॥
तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं ।
तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥५९॥
उच्छाप मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं ।
नग्न देखिल्या पुरुरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥६०॥
ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी ।
देखोनि तिचिया स्वरुपासी । पुरुरवा तिसी भूलला ॥६१॥
विसरोनि आपुली महंती । वश्य झाला वेश्येप्रती ।
रुपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥६२॥
नग्न देखिलिया रायासी । सांडूनि जावें उर्वशीं ।
ऐशी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणिली ॥६३॥
तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी ।
पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं भाकेसी दिधलें रायें ॥६४॥
ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती ।
तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥६५॥
भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म ।
विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥६६॥
तेथ मेषरुपें दोघे जण । झाले आश्विनीकुमार आपण ।
उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥६७॥
पुरुरव्याचा भोगप्रांतीं । उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती ।
दोनी एडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥६८॥
ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी ।
रागें निर्भर्त्सी रायासी। नपुंसक होसी तूं एक ॥६९॥
वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें ।
जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥७०॥
ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु ।
धांवतां फिटला पीतांबरु । तें नृपवरु स्मरेना ॥७१॥
पराभवूनि ते चोर । मेष आणितां सत्वर ।
विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥७२॥
नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी ।
तिचेनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥७३॥