श्लोक १६ वा
सोऽहं ममाहमिति मूढमतिर्विगाढ्स्त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे ।
तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाहं संसाधयामि भगवन्ननुशाधि भृत्यम् ॥१६॥
तूझी माया विचित्र उपाधी । शरीरीं केली आत्मबुद्धी ।
आत्मीयें शरीरसंबंधीं । विपरीत सिद्धी वाढली ॥७१॥
मी माझें वाढलें गाढ । तेणें मति झाली मूढ ।
गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥७२॥
ऐशी ही बुद्धि विवळे । अप्रयासें तत्व आकळे ।
तैशी कृपा कीजे राऊळें । दासगोपाळें तारावया ॥७३॥
ऐकें गा पुरुषोत्तमा । निजदासां आपुल्या आम्हां ।
सोडवी गा संसारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥७४॥
तूज सांडोनि हृषीकेशी । पुसों जावें आणिकांपासीं ।
तें नये माझिया मनासी । विषयीं सर्वांसी व्यापिलें ॥७५॥