श्लोक ८ वा
त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं । व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्गुणस्थः ।
नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै । यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥८॥
झोंप लागल्या झोंप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसतचि नाहीं ।
तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं सुरनरां ॥७५॥
मूळींच तुझी अतर्क्य माया । तिसी गुणक्षोभु जाहला साह्या ।
ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥७६॥
तूं धरोनि दैवीमायेसी । ब्रह्मादिकांतें सृजिसी ।
प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ॥७७॥
स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली । प्रतिपाळूनि संहारिली ।
ते क्रिया कर्त्यासी नाहीं लागली । तेवीं सृष्टि केली त्वां अलिप्तत्वें ॥७८॥
मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं ।
शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा तूं ॥७९॥
समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग चढे ।
तैं तुज अवतार धरणें घडे । आमुचें सांकडें फेडावया ॥८०॥
करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी यथस्थितु ।
देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु तूं श्रीकृष्णु ॥८१॥
तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें अनुसंधान ।
तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन यालागीं ॥८२॥
ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी परी अवतार ।
त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि तीर्थांसी ॥८३॥
तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो जाणावा गुणातीतु ।
त्याचा चरणरेणु करी घातु । त्रैलोक्यांतु महापापां ॥८४॥
ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा ।
असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां निजलाभु ॥८५॥
चरण देखती ते भाग्याचे । त्यांचें महिमान न वर्णवे वाचे ।
पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस साचें स्वामिया ॥८६॥
अग्निशिखा समसमानीं । इंधन घलितां वाढे अग्नी ।
आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनीं ते त्यागवी ॥८७॥