श्लोक २० वा
आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः ।
यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते ॥२०॥
पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं ।
मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्रूप ॥१७॥
जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं ।
हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्रूप पाहीं कळतसे ॥१८॥
सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना ।
तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥१९॥
जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी ।
आधी लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥
आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं ।
काळें ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२१॥
तूझीच तूजदेखतां । काळें गिळिली बाल्यावस्था ।
तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२॥
केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळू लागला पैं गा ।
आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२३॥
क्षणक्षणा काळू जातसे व्यर्थ । कांही न साधे जी परमार्थ ।
जन्ममरणांचा आवर्त । पुढें अनर्थ रोकडा ॥२४॥
स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म ।
यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥
नरदेह मोक्षाचा वांटा । वृथा जातसे कटकटा ।
हृदयीं आधी लागला मोटा । विषयचेष्टा विसरला ॥२६॥
प्रत्यक्ष लक्षणें अनित्य । संसारु दिसे नाशवंत ।
यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२७॥
याचिपरी अनुमाना । परलोकभोगभावना ।
आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२८॥
कैं कृपा करील गोविंद । कैं तूटेल भवबंध ।
कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणें होय ॥२९॥
धांव पाव गा श्रीहरी । कृपा करीं दीनावरी ।
मज उद्धरीं भवसागरीं । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥
जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागीं तळमळी ।
प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥३१॥
एक नेणोनि नरदेहा मुकले । एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले ।
एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥३२॥
एक साधनाभिमानें ठकिले । एक करूं करूं म्हणता गेले ।
एक करितां अव्हाटां भरले । करणें ठेलें तैसेंचि ॥३३॥
जरी विवेक कळला मना । तरी न तूटती विषयवासना ।
तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितू ॥३४॥
कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी ।
तोचि आपुला गुरु आपणासी । विशेषेंसी जाणावा ॥३५॥
त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशीं ।
तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥३६॥
ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो ।
ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥३७॥
उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ ।
तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा । ॥३८॥