श्लोक ८ वा
अहं किल पुराऽनन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् ।
अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥८॥
मज अधिकारु नाहीं पूर्ण । हें मीही जाणतों आपण ।
मागें म्यां केलें भगवद्भजन । तें तूं कथन अवधारीं ॥८५॥
म्यां पूर्वी आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वांयां ।
प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥८६॥
मज देव तुष्टला प्रसन्नपणें । मागसी तें देईन म्हणे ।
तेथें मायेनें ठकिलें मजकारणें । माझा पुत्र होणें मी मागें ॥८७॥
तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान ।
तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळक पूर्ण मी तुझें ॥८८॥
यापरी श्रीकृष्णपासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी ।
कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसीं मी जाणें ॥८९॥
श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं ।
तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसीं उद्धरीं ॥९०॥
जे मायेनें ठकिलों वाडेंकोडें । ते माया समूळ झडे ।
ऐसें सांगिजे रोकडें । बहु बोलोनि पुढें काय काज ॥९१॥;