श्लोक १० वा
त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः स्वौको विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते ।
नान्यस्य बर्हिषि बलीन् ददतः स्वभागान् धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ॥१०॥
तापसां बहु विघ्नअपावो । आम्हीं करावा अंतरावो ।
हा आमुचा निजस्वभावो । नव्हे नवलावो नारायणा ॥४८॥
हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप-तप-भक्तिसंभ्रम ।
ऐसे जे का शठ परम । विघ्नांचा आक्रम त्यांवरी चाले ॥४९॥
ते आमची विघ्नस्थिति । न चलें तुझिया भक्तांप्रती ।
तूं रक्षिता भक्तपति । तेथें विघ्नांची गति पराङ्मुख सदा ॥१५०॥
माझिया निजभक्तांसी । विघ्नें कैंचीं म्हणसी त्यांसी ।
ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन तुजपासीं देवाधिदेवा ॥५१॥
पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें ।
जे नित्य निष्काम भजती तूंतें । नाना विघ्नें त्यांतें सुरवर रचिती ॥५२॥
उल्लंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें ।
यालागीं सुरवर त्यातें । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥५३॥
बळी नेदूनि आम्हांसी । हे जाऊं पाहती पूर्णपदासी ।
येणें क्षोभें इंद्रादिक त्यांपासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥५४॥
या लागीं त्यांच्या भजनापासीं । विघ्नें छळूं धांवतीं आपैसीं ।
विघ्नीं अभिभव नव्हे त्यांसी । तू हृषीकेशी रक्षिता ॥५५॥
सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा ।
त्यांस आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥५६॥
भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धांव म्हणती हृषीकेशी ।
तेव्हां तूं धांवण्या धांवसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥५७॥
विघ्न न येतां भक्तांपासीं । आधींच भक्तसंरक्षणासी ।
तूं भक्तांचे चौंपासीं । अहर्निशीं संरक्षिता ॥५८॥
विघ्न छळूं धांवे सकोप । तंव विघ्नीं प्रगटे तुझें स्वरूप ।
यालागीं भक्तांसी अल्प । विघ्नप्रताप बाधूं न शके ॥५९॥
कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरि कामाचा हृदयवासी ।
तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यांसी । भय भक्तांसी स्वप्नीं नाहीं ॥१६०॥
विघ्न उपजवी विरोधु । तंव विरोधा सबाह्य गोविंदु ।
मग विरोध तोचि महाबोधु । स्वानंदकंदु निजभक्तां ॥६१॥
ज्यासी तुझ्या चरणीं भावार्थु । त्यासी विघ्नीं प्रगटे परमार्थु ।
ऐसा भावबळें तूं समर्थु । साह्य सततु निजभक्तां ॥६२॥
यापरी समर्थ तूं संरक्षिता । ते जिणोनि विघ्नां समस्तां ।
पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥६३॥
देवो संरक्षिता ज्यासी । विघ्नें छळूं धांवती त्यासी ।
मा सकामाची गती कायसी । विदेहा म्हणसी तें ऐक ॥६४॥
विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां बळिपूजनीं ।
जे भजले यागयजनीं । देव त्यांलागोनी न करिती विघ्न ॥६५॥
इंद्र याज्ञिकांचा राजा । सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा ।
यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या बळिपूजा न करिती विघ्न ॥६६॥
म्हणसी कामादिक विटंबिती । ते निष्काम कदा नातळती ।
सहज कामा वश असती । सदा कर्में करिती सकाम ॥६७॥
जे मज कामासी वश होती । ते तप वेंचोनि भोग भोगिती ।
जे आतुडले क्रोधाच्या हातीं । ते वृथा नागवती तपासी ॥६८॥