श्लोक ५ व ६ वा
वक्ता कर्ताऽविता नान्यो धर्मास्याच्युत ते भुवि ।
सभायामपि वैरिञ्च्यां यत्र मूर्तिधराः कलाः ॥५॥
कर्ताऽवित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूधन ।
त्यक्ते महीतले देव विनष्टं कः प्रवक्ष्यति ॥६॥
अलुप्तज्ञानें स्वधर्मवक्ता । ये भूलोकीं गा तत्त्वतां ।
तुजवांचोनि अच्युता । आणिक सर्वथा असेना ॥३६॥
एक शास्त्रमर्यादाव्युत्पत्ती । कर्मकलाप बोलों जाणती ।
परी कर्माची आचरती गती । तेही नेणती तत्त्वतां ॥३७॥
यालागीं गा भगवंता । धर्माचा कर्ता वक्ता ।
धर्म विस्तारूनि रक्षिता । आणिक सर्वथा असेना ॥३८॥
पहातां या लोकांच्या ठायीं । तुजऐसा सर्वज्ञ नाहीं ।
ऐसें विचारितां लोकीं तिंही । तुजसमान नाहीं सांगता ॥३९॥
जरी सत्यलोक पाहणें । जेथें चारी वेद षड्दर्शनें ।
इतिहास स्मृति पुराणें । मूर्तिमंतपणें उभीं असतीं ॥४०॥
तेथें सनकादिकांचा प्रश्न । ब्रह्मयासी न सांगावे जाण ।
तुवां हंसरूपें येऊन । समाधान दीधलें ॥४१॥
ते ब्रह्मसभेचा ठायीं । तुजऐसा वक्ता नाहीं ।
तो तूं भक्तानुग्रहें पाहीं । या लोकांच्या ठायीं मूर्तिमंत ब्रह्म ॥४२॥
तेणें तुवां सर्व कर्मधर्मसंस्था । करूनि दाविली तत्त्वतां ।
तो तूं निजधामा गेलिया आतां । स्वधर्मवक्ता मग कैंचा ॥४३॥
भक्तियुक्त स्वधर्मगती । सांगवया यथास्थिती ।
तुजवांचोनियां श्रीपती । आणिकासी शक्ति असेना ॥४४॥
तूं भक्तसाह्य जगज्जीवन । भक्तमदगजभंजन ।
यालागीं नांवें तुं `मधुसूदन' । ऐसें प्रार्थून बोलत ॥४५॥