श्लोक ५ वा
एतत्कमलपत्राक्ष, कर्मबन्धविमोचनम् ।
भक्ताय चानुरक्ताय, ब्रूहि विश्वेश्वरेश्वर ॥५॥
कमळनाभि नारायणा । भक्तविश्राम कमळवदना ।
कमलालया कमलनयना । विनंती श्रीकृष्णा अवधारीं ॥३४॥
तुवां पाहिल्या कृपादृष्टीं । तत्काळ पैं उठाउठीं ।
सुटती कर्मबंधाच्या गांठी । स्वानंदपुष्टी निजभक्तां ॥३५॥
जेवीं घृताचें कठिणपण । क्षणें विरवी सूर्यकिरण ।
तेवीं कर्मबंधा निर्दळपण । तुझें कृपावलोकन करी कृष्णा ॥३६॥
कां सैंधवाचा महागिरी । जेवीं विरे सिंधूमाझारीं ।
तेवीं कर्मबंधा बोहरी । तुझी कृपा करी श्रीकृष्णा ॥३७॥
तुझी झालिया कृपादृष्टी । कर्माकर्मांसी पडे तुटी ।
जेवीं सूर्योदयासाठीं । नातुडे भेटीं खद्योता ॥३८॥
तमीं दाटती खद्योतकोडी । तेवीं अज्ञानीं कर्माची आडाडी ।
तुझा कृपासूर्य जोडल्या जोडी । कर्में जाती बापुडीं विरोनी ॥३९॥
ऐशिया निष्कर्म कृपायुक्त । तुझे नांदती निजभक्त ।
जे कां विषयीं अतिविरक्त । सदा अनुरक्त हरिचरणीं ॥४०॥
तें पूर्णकृपेचें आयतन । तुझें भजनपूजाविधान ।
तें मज सांग कृपा करुन । मी अतिदिन पैं तुझें ॥४१॥
म्हणसी तुज हा अधिकार नाहीं । परी मी शरण आलों तुज पाहीं ।
शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाहीं श्रीकृष्णा ॥४२॥
तुवां उद्धरिलें पशु-गीध-गजांसी । गणिके तारिलें कुंटणीसी ।
तेचि कृपा करीं आम्हांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥४३॥
म्हणसी ’ब्रह्मा शिव असतां सृष्टीं । मजचि पुसायाची श्रद्धा मोठी ।
कैसेनि पां वाढली पोटीं’। ऐक ते गोठी सांगेन ॥४४॥
ब्रह्मा जगाचा कर्ता होये । तोही विसरला निजात्मसोये ।
तो तुझ्या पोटा येऊनि पाहें । निजज्ञान लाहे तुझेनि ॥४५॥
शिव पायवणी वाहे माथां । तुझें नाम सदा जपतां ।
तुझे कृपेस्तव तत्त्वतां । तोही निजात्मता पावला ॥४६॥
यालागीं तूं ईश्वराचा ईश्वर । नियंत्या नियंता सवश्वर ।
विश्वीं विश्वात्मा विश्वंभर । विश्वेश्वर तूं कृष्णा ॥४७॥
यापरी तूं ज्ञानविधी । पूण बोधाचा उदधी ।
जेणें होय निजात्मसिद्धी । ते पूजाविधी मज सांग ॥४८॥;
ऐसा भक्तवचनें तो संतोषला । पूर्ण निजबोधें द्रवला ।
निजात्मकृपा कळवळला । काय बोलिला श्रीकृष्ण ॥४९॥