श्लोक १५ व १६ वा
ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः ।
उर्वशीमप्सरःश्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥१५॥
इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् ।
ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥१६॥
ऐकोनि नारायणवचन । मस्तकांबुजीं करूनियां नमन ।
उर्वशी पुढां सून । कामादि गण निघाले वेगीं ॥९४॥
नारायणांचे ऊरुस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं ।
तेंचि नांव झालें तिसी । म्हणती 'उर्वशी' स्वर्गांगना ॥९५॥
ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त ।
मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारयणशक्ति ॥९६॥
तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र ।
तेणें अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥९७॥
इंद्रें देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं ।
बाहेर यावें सभेसी । हें वर्षानुवर्षी नाठवे ॥९८॥
हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा ।
पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥९९॥
ऐक राया अतिअपूर्व । छळवादियां पूजा सर्व ।
करून दाखवी स्वयमेव । 'पूर्णानुभव' या नांव ॥२००॥
(आशंका) ॥भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न ।
नारायण चैतन्यघन । तेणें विघ्नें संपूर्ण पराभविलीं ॥१॥
मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशीं विघ्नें जैं छळूं येती ।
तैं कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥२॥
ब्रह्मादिकां सर्व भूतां । भ्रुकुटिमात्रें जो नियंता ।
त्या भगवंतातें भजतां । विघ्नें सर्वथा बाधूं न शकती ॥३॥
ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण ।
भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥४॥
इंद्रमुख कामादिक । विघ्नें छळिती सकळ लोक ।
त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शों नेदी ॥५॥
विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण ।
आपधाकें विघ्नें पळतीं जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥६॥
करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार ।
त्याच्या अवतारांचें चरित्र । अतिविचित्र अवधारीं ॥७॥