श्लोक ८ वा
पुंसो युक्तस्य नानार्थो भ्रमः स गुणदोषभाक् ।
कर्माकर्मविकर्मेति गुणदोषधियो भिदा ॥८॥
परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुष बोलिजे अयुक्त ।
त्यासी नानात्वें भेदू भासत । निजीं निजत्व विसरोनी ॥५७॥
त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदू सत्यत्वें भासे ।
त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥
जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष नाहीं ।
दिसावया ठावो नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥
यालागीं भेदाच्या उद्भटीं । गुणदोषदृष्टी उठी ।
तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥
भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म ।
जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥
कर्में विकर्में नरकयातना । काम्यकर्में स्वर्गु जाणा ।
कर्मेंचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६२॥
येथ म्हणती कर्म कोण । अकर्माचें काय लक्षण ।
विकर्माचा कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥
काया वाचा अथवा मन । करिजे तितूकें कर्म जाण ।
सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥
मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं ।
अकर्म म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥
जें कर्मावेगळें सर्वांगें । जेथ कर्म लाबितांही न लगे ।
जें नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें अकर्म ॥६६॥
विधिनिषेधजोडेपाडें । जेथ विशेष कर्म वाढे ।
विकर्म त्यातें म्हणणें घडें । थोर सांकडें पैं याचें ॥६७॥
कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावलें जाण ।
उठिले विधिनिषेध दारुण । विकर्म जाण तें म्हणिजे पैं ॥६८॥
जें विधीसी नातूडे । तें निषेधाचे अंगा चढे ।
करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडें निषिद्धचि ॥६९॥
ऐसें कर्म विकारलें । तें विकर्म पदें वाखाणिलें ।
एवं कर्माकर्म दाविलें । विभागनिमित्त तूज ॥७०॥
जीवासी आविद्यक उत्पत्ती । त्याचीं कर्में आविद्यकें होतीं ।
श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७१॥
अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि कर्म ।
नित्य न करणें तें अकर्म । विकर्म तें निषिद्ध ॥७२॥
ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपें वाढली सृष्टीं ।
तेथ गुणदोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥
अभेदीं भेदू कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी ।
विधिनिषेधीं पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥
पुरुष एकु एकला असे । तोचि मनोरथपूजे बैसे ।
ध्येयध्याताध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥
तेथे नाना परीचे उपचार । पूजासामग्रीसंभार ।
ऐसा एकपणीं अपार । भेदू साचार वाढवी ॥७६॥
तेथ ध्येय उत्तम म्हणे जाण । ध्याता नीच होये आपण ।
तदंगें ध्यान गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥
ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र ।
ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥
एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं ।
गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥
ध्येयध्याताध्यान । आघवाची आहे आपण ।
तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥
उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं ।
तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥
जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा ।
पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥
सापा पाजिजे पीयूख । तेंचि परतोनि होय विख ।
तैसें इंद्रियां दीजे जंव जंव संतोख । तंव तंव दूःख भोगिजे ॥८३॥