श्लोक १० वा
ब्रह्मरुद्रादयस्ते तु, दृष्टवा योगगतिं हरेः ।
विस्मितास्तां प्रशंसंतः, स्वं स्वं लोकं ययुस्तदा ॥१०॥
आम्ही मायानियंते निजशक्तीं । आम्ही जाणों दुर्गमा योगगती ।
आम्ही सर्वद्रष्टे त्रिजगतीं । हा अभिमान चित्तीं देवांसीं ॥९०॥
तिंहीं देखोनि कृष्णगती । गळाली जाणिवेची वृत्ती ।
लाजें पळाली अभिमानस्थिती । तिंहीं मांडिली स्तुती श्रीकृष्णाची ॥९१॥
रुद्र पंचमुखीं करी स्तुती । ब्रह्मा चहूं मुखीं वर्णीं कीर्ती ।
देव विस्मयातें पावती । अगाध गती श्रीकृष्णाची ॥९२॥
करितां श्रीकृष्णाची स्तुती । देवांसी न बाणे तृप्ती ।
वर्णित श्रीकृष्णकीर्ति । स्वलोकाप्रती सुर गेले ॥९३॥
पूर्वीं सांगितली कृष्णगती । तेचि सांगावया विशद स्थिती ।
परतोनि परीक्षितीप्रती । अतिप्रीतीं शुक सांगे ॥९४॥