श्लोक ७ वा
देशकालादिभावानां वस्तुनां मम सत्तम ।
गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम् ॥७॥
भक्तांमाजीं भक्तोत्तम । साधुलक्षणीं साधुसम ।
यालागीं उद्धवासी `सत्तम' । म्हणे पुरुषोत्तम अतिप्रीतीं ॥७८॥
उद्धवा येथ भलता नर । भलता करील कर्मादर ।
यालागीं वर्णाश्रमविचार । नेमिला साचार वेदांनीं ॥७९॥
जेथ करूं नये कर्मतंत्र । ऐसा देश जो अपवित्र ।
आणि काळादि द्रव्य विचित्र । पवित्रापवित्र सांगेन ॥८०।