श्लोक ५ वा
मुनिः प्रसन्नगम्भीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यस्तिमितोद इवार्णवः ॥५॥
'समुद्र' जो गुरु करणें । त्याचीं परिस पां लक्षणें ।
गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणें इत्यादि ॥४१॥
समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा पसन्नवदन ।
केव्हाही धुसमुशिलेपण । नव्हेजाण निजबोंधें ॥४२॥
मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेनी अतिनिर्मळ ।
तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥
जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।
वेळा नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥
समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसी ।
योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥
रिगतीमागी जाणें जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।
येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी करीतसे ॥४६॥
तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।
आपभयें भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥
जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघे सागरा ।
तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥
मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।
तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्यानें निर्धारीं न राहे ॥४९॥
समुद्रीं मीनली ताम्रपर्णी । तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।
योगिया मिनली श्रद्धा येऊनि । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥
जो समुद्रामाजीं रिघोनि राहे । तो नानापरीचीं रत्ने लाहे ।
योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥५१॥
जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।
तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥
प्रवाहेंवीण जळ । समुद्रीं जेवीं निश्चळ ।
मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥
समुद्रीं प्रवाहो नव्हे कहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।
तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥
समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।
ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥
समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।
योगिया अंतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥
समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळें ।
सर्वथा योगी नुचंबळें । योगबळें सावधु ॥५७॥
समुद्रीं भरतें पर्वसंबंधें । योगिया परिपूर्ण सदानंदें ।
समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधें सदा सम ॥५८॥
समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥
जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।
त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्वता सेंदेची ॥६०॥
सागरीं वरुषल्या घन । वृथा जायें तें जीवन ।
तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥
अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवव्यथा ।
यालागीं मुमुक्षीं सर्वथा । भगवद्भक्तां भजावें ॥६२॥