श्लोक २४ वा
एवं गुरूपासनयैकभक्त्या विद्याकुठारेण शितेन धीरः ।
विवृश्च्य जीवाशयमप्रमत्तः संपद्य चात्मानमथ त्यजास्त्रम् ॥२४॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
न करितां सद्गुरुभजन । नव्हे भववृक्षाचें छेदन ।
जरी कोटिकोटी साधन । आनेआन केलिया ॥७१॥
भववृक्षातें छेदिती । केवळ जाण गुरुभक्ती ।
अरिनिर्दळणी निश्चितीं । जेवीं निजशक्ति शूरांची ॥७२॥
दूरी करावया दुरित । जेवीं गंगाजळ समर्थ ।
तेवीं भवभया भस्म करीत । जाण निश्चित गुरुभक्ति ॥७३॥
करितां सत्यव्रतग्रहण । पाप स्वयें जाय पळोन ।
तेवीं करितां गुरुभजन । भवनिर्दळण स्वयें होय ॥७४॥
हनुमंत देखतां दिठीं । भूतें पळती बारा वाटीं ।
तेवीं गुरुभजनपरिपाटीं । पळे उठाउठी भवभय ॥७५॥
मरतां घडे अमृतपान । तैं मरणासचि आलें मरण ।
तेवीं करितां गुरुभजन । जन्ममरण निमालें ॥७६॥
अंतीं अवचटें हरि म्हणतां । पांपरा हाणे यमदूतां ।
तेवीं सद्गुरूते भजतां । हाणे लाता भवभया ॥७७॥
करावया भवनिर्दळण । मुख्य करावें गुरुभजन ।
हेंचि श्रेष्ठ गा साधन । सभाग्य जाण गुरुभक्त ॥७८॥
कोण सद्गुरु कैशी भक्ती । ऐसें कांहीं कल्पिसी चित्तीं ।
तेही मी यथानिगुतीं । मागां तुजप्रती सांगीतली ॥७९॥
जो शब्दपरनिष्णात । शिष्यप्रबोधनीं समर्थ ।
तोचि सद्गुरु येथ । जाण निश्चित उद्धवा ॥४८०॥
जो स्वरूपीं करी समाधान । तोचि सद्गुरु सत्य जाण ।
त्यावेगळें सद्गुरुपण । होआवया कारण असेना ॥८१॥
त्या सद्गुरुभजनाची परी । तुज मी सांगेन निर्धारीं ।
सर्व कर्मधर्मांचिया शिरीं । जो कां करी गुरुभजन ॥८२॥
गुरु म्हणों पित्यासमान । तंव तो एकजन्मींचा जाण ।
हा मायबापू सनातन । जनक पूर्ण जगाचा ॥८३॥
गुरु मातेसमान पाहों । तंव गर्भजन्में तिचा स्नेहो ।
गर्भवास निवारी गुरुरावो । अधिक स्नेहो पुत्रापरीस ॥८४॥
उदराबाहेर पडल्यापाठीं । पुत्रस्नेहें माता उठी ।
तें बाहेरील घालूनि पोटीं । स्नेहें गोमटी गुरुमाता ॥८५॥
गुरु मानूं स्वामीसमान । स्वामी निवारूं न शके मरण ।
सद्गुरु चुकवी जन्ममरण । स्वामी संपूर्ण गुरुरावो ॥८६॥
गुरु मानूं कुलदेवता । तंव तिसी कुलधर्मी पूज्यता ।
हा कुलदेवतेची देवता । नित्य पूज्यता निजकर्मीं ॥८७॥
गुरु मानूं कल्पतरूसमान । तंव कल्पतरु दे कल्पिलें दान ।
सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण । अगाध दान निर्लोभे ॥८८॥
चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । सद्गुरु करी चिंतेच्या घाता ।
चित्ता मारूनि दे चैतन्यता । अक्षयता निजदान ॥८९॥
कामधेनूचें दुभतें । तें कामनेचपुरतें ।
सद्गुरु दुभे स्वानंदार्थे । कामनेतें निर्दळी ॥४९०॥
गुरुसमान म्हणों सागरू । तो गंभीर परी सदा क्षारू ।
हा स्वानंदें नित्य निर्भरू । अतिमधुरू निजबोधें ॥९१॥
गुरु परब्रह्मसमान । हेंही बोलणें किंचित न्यून ।
गुरुवाक्यें ब्रह्म सप्रमाण । येरवीं ब्रह्मपण शब्दमात्र ॥९२॥
शब्दीं लोपूनि शब्दार्था । गुरु प्रबोधी संविदर्था ।
त्याहूनि पूज्य परता । नाहीं सर्वथा त्रिलोकीं ॥९३॥
गुरु माता गुरु पिता । गुरु स्वामी कुळदेवता ।
गुरूवांचोनि सर्वथा । आणिक देवता स्मरेना ॥९४॥
थोर मांडलिया सांकडें । जैं गगन गडगडूनि पडे ।
तैं न पाहे आणिकाकडे । नाम पढे गुरूचें ॥९५॥
काया वाचा मनें प्राणें । जो गुरूवांचोनि आन नेणे ।
तैसाचि भजे अनन्यपणें । गुरुभक्ति म्हणणें त्या नांव ॥९६॥
पक्षिणीचीं अपक्ष पिलें । तीं तिसीच स्मरती सर्वकाळें ।
तेवीं जागृति स्वप्न सुषुप्तिमेळें । जो गुरुवेगळें स्मरेना ॥९७॥
मागां सांगीतलें भगवद्भजन । आतां सांगसी गुरुसेवन ।
नाहीं एकविध निरूपण । ऐसा विकल्प जाण न धरावा ॥९८॥
सद्गुरु तोचि माझी मूर्ती । निश्चयेंसी जाण निश्चितीं ।
विकल्प न धरावा ये अर्थीं । अनन्यभक्ति या नांव ॥९९॥
एकाग्रता जें गुरुभजन । तेंचि माझें परमपूजन ।
गुरूसी मज वेगळेपण । कल्पांतीं जाण असेना ॥५००॥
गुरु भगवंत दोन्ही एक । येणें भावें निजनिष्टंक ।
भजे तोचि गुरुसेवक । येरू तो देख अनुमानी ॥१॥
माझिया ऐक्यता अतिप्रीतीं । जेणें आदरिली गुरुभक्ती ।
तोचि धन्य धन्य त्रिजगतीं । भजती स्थिती तें ऐक ॥२॥
करावया गुरुसेवे । मनापुढें देह धांवे ।
एकला करीन सर्व सेवे । येवढे हांवे उद्यतू ॥३॥
सेवेच्या दाटणी जाण । अधिकचि होय ठाणमाण ।
अंग अंगऊनि अंगवण । सेवेमाजी जाण विसांवा त्यासी ॥४॥
सेवेचिया आवडीं । आरायेना अर्ध घडी ।
आवडीचे चढोवढी । चढती गोडी गुरुभजनीं ॥५॥
नित्य करितां गुरुसेवा । प्रेमपडिभरू नीच नवा ।
सद्भावाचिया हांवा । गुरुचरणीं जीवा विकिलें ॥६॥
आळसु येवोंचि विसरला । आराणुकेचा ठावो गेला ।
गुरुसेवासंभ्रमें भुलला । घेवों विसरला विषयांतें ॥७॥
तहान विसरली जीवन । क्षुधा विसरली मिष्टान्न ।
करितां गुरुचरणसंवाहन । निद्रा जाण विसरला ॥८॥
जांभयी यावयापुरती । सवडी उरेना रिती ।
तेथें निद्रेलागीं केउती । राहावया वस्ती मिळेल ॥९॥
मुखीं सद्गुरुचे नाम । हृदयीं सद्गुरूचें प्रेम ।
देहीं सद्गुरूचें कर्म । अविश्रम अहर्निशीं ॥५१०॥
गुरुसेवेसी गुंतलें मन । विसरला स्त्री पुत्र धन ।
विसरला मनाची आठवण । मी कोण हें स्फुरेना ॥११॥
नवल भजनाचा उत्सावो । भजतां नाठवे निजदेहो ।
थोर सेवेचा नवलावो । निजात्मभावो गुरुचरणीं ॥१२॥
ऐसाही प्रारब्धमेळा । अवचटें झालिया वेगळा ।
न तुटे प्रेमाचा जिव्हाळा । भजनीं आगळा सद्भावो ॥१३॥
गुरूचा वसता जो ग्राम । तेथेंचि वसे मनोधर्म ।
गुरुध्यान तें स्वधर्मकर्म । सेवासंभ्रम सांडीना ॥१४॥
गुरुमूर्तीची सवे त्यासी । ते मूर्ति बैसवी हृदयावकाशीं ।
मग नानाभजनविलासीं । आवडी कैसी भजनाची ॥१५॥
चिन्मात्र पूर्णिमा गुरु पूर्णचंद्र । तळीं आपण होय आर्त चकोर ।
मग स्वानंदबोधाचे चंद्रकर । निरंतर स्वयें सेवी ॥१६॥
सद्गुरु सूर्य करी चिद्गगनी । आपण होय सूर्यकांतमणी ।
त्याचेनि तेजें प्रज्वळोनी । स्वभावें मायावनीं होळी करी ॥१७॥
सद्गुरुकृपामृताच्या डोहीं । स्वयें तरंगू होय तये ठायीं ।
सबाह्य तद्रूपें पाहीं । भावना हृदयीं भावितु ॥१८॥
आपुला निजस्वामी जो सद्गुरु । भावी निर्विकल्प कल्पतरू ।
त्याचे छाये बैसोनि साचारू । मागे वरू गुरुभक्ति ॥१९॥
सद्गुरु कामधेनु करी जाणा । वत्सरूपें भावी आपणा ।
आवडीं चाटवी बोधरसना । स्वानंदपान्हा सेवितू ॥५२०॥
तुझ्या सकळ वृत्तींची सेवा । म्यांचि करावी गा गुरुदेवा ।
ऐसें प्रार्थूनि सद्भावा । हा वरू मज द्यावा कृपानिधी ॥२१॥
तेथ संतोषोनि गुरुनाथें । वरू दीधला वरदहस्तें ।
हर्षें वोसंडत चित्तें । धन्य मी वरातें लाधलों ॥२२॥
ऐसी लाहोनि वरदस्थिती । तेचि सेवा आदरी प्रीतीं ।
अतिधन्य भावार्थ गुरुभक्ति । नाना उपपत्ती गुरुभजना ॥२३॥
सद्गुरूचीं दहाही करणें । मनबुद्ध्यादि अंतःकरणें ।
क्रियामात्र मीचि होणें । ऐसें जीवेंप्राणें भावितु ॥२४॥
सद्गुरु जे जे भोग भोगिती । ते मीचि होईन निश्चितीं ।
एवं मीचि एक गुरुभक्ती । दुजी स्थिती हों नेदीं ॥२५॥
सद्गुरु जेथें उभे ठाकती । तैं पायांतळीं मीचि क्षिती ।
सद्गुरु जेथें जेथें चालती । ते मार्गींची माती मी होईन ॥२६॥
चरणक्षालनासी समस्त । मीचि उदक मीचि तस्त ।
मीचि चरण प्रक्षालित । चरणतीर्थ मी सेवीं ॥२७॥
सद्गुरुचरणींचे रजःकण । मीचि होईन आपण ।
सद्गुरु करिती आरोहण । तें सिंहासन होईन मी ॥२८॥
सद्गुरुचें सिंहासन । तें मीचि होईन आपण ।
त्यावरी बैसतें आसन । तेंही जाण होईन मी ॥२९॥
सद्गुरूसी स्नेह लागे । तें मी होईन सर्वांगे ।
गुरूसी वोठंगावया पुढें मागें । मृदुळी सर्वांगें मी होईन ॥५३०॥
मनींचा ऐसा आवांका । सद्गुरूच्या सिद्ध पादुका ।
त्या मी होईन देखा । नेदीं आणिकां आतळों ॥३१॥
मी होईन गुरूच्या श्वासोच्छ्वासा । वेगीं बाहेर निघेन नासा ।
गुरु घेतील ज्या सुवासा । त्या त्या विलासा मी होईन ॥३२॥
गुरु अवलोकिती कृपादृष्टी । त्या दृश्याची मी होईन सृष्टी ।
गुरूसी देखती देखणी पुष्टी । ते मी उठाउठीं होईन ॥३३॥
गुरूसी आवडतें निरूपण । तें मी श्रवणीं होईन श्रवण ।
अथवा रुचेल जें कीर्तन । तें गाता गायन मी होईन ॥३४॥
सद्गुरुमुखींची जे कथा । ते मी आदरें होईन तत्त्वतां ।
अक्षरीं अक्षर अक्षरार्था । मीचि सर्वथा होईन ॥३५॥
सद्गुरु जेथ करिती स्नान । तें मी अंगस्पर्शनाचें जीवन ।
गुरु करिती जें आचमन । तेंही जाण होईन मी ॥३६॥
गुरु परिधान करिती वास । तें मी होईन सुवास ।
गुरुचरण पुसावयास । तेंही धूतवास मी होईन ॥३७॥
गुरूसी करिती विलेपन । तें मी होईन शुद्ध चंदन ।
चरणीं अर्पितें सुमन । मीचि जाण होईन ॥३८॥
सद्गुरु करिती भोजन । तेथ मीचि ताट मीचि अन्न ।
रसस्वाद पक्वान्न । पंक्तिकारु जाण मी होईन ॥३९॥
मथोनियां दहीं मथित । सारांश तें नवनीत ।
वैराग्यअग्निसंतप्त । भोजनीं मुख्य घृत मी होईन ॥५४०॥
परिपाकीं स्वादिष्टपण । सर्वां चवींचें कारण ।
मी होईन वरी लवण । न्यून तें पूर्ण गुरु करिती ॥४१॥
गुरु करिती प्राशन । तें मी होईन जीवन ।
सद्गुरूचें धालेपण । ते उद्गार जाण मी होईन ॥४२॥
गुरूसी जें जें गोड लागे । ते ते पदार्थ मी होईन अंगें ।
सद्गुरुसी ज्याची रुचि लागे । तें मी सर्वांगें होईन ॥४३॥
सद्गुरु आंचवती जेथ । मी उष्णोदक मी तस्त ।
शिंतोडे लागती जेथ जेथ । तेही समस्त होईन मी ॥४४॥
गुरूसी अर्पिती जें फळ । तें मी होईन तत्काळ ।
गुरुअर्पणें सफळ । फळाचें फळ मी होईन ॥४५॥
सद्गुरूचें घ्यावया उच्छिष्ट । मजचि मोठा लवलवाट ।
मांजर होऊनियां ताट । चरचराट चाटीन मी ॥४६॥
गुरु करिती करोद्वर्तन । तो मी होईन सुगंधचंदन ।
मुखवासा सुवासपण । मीचि जाण होईन ॥४७॥
फळाशा फोडूनि फोडी । वासनाशिरा काढूनियां विडी ।
रिघोनियां सद्गुरूच्या तोंडीं । तांबूल गोडी मी होईन ॥४८॥
जाळूनियां अहंकठिणपणा । मी होईन सोहं शुद्ध चुना ।
शांति परिपक्व लागोनि पाना । सद्गुरुवदना पावेन ॥४९॥
सर्व सारांचें शुद्ध सार । तो होईन खदिरसार ।
सद्गुरुमुखी रंगाकार । मीचि साचार शोभेन ॥५५०॥
सद्गुरुमुखींचें पवित्र पीक । वरच्यावरी मी घेईन देख ।
पिकदाणीचे मुखाचें मुख । आवश्यक मीच होईन ॥५१॥
गुरूचा उगाळू मी होईन । पीक पिकदाणी धरोनि जाण ।
चवरी जी मक्षिकानिवारण । ती मी होईन निजांगें ॥५२॥
गुरूचा उगाळू घ्यावया देख । मी होईन आगळा सेवक ।
नातरी लडिवाळ बाळक । गुरुअंकीं देख मी होईन ॥५३॥
माझिया गुणांची सुमनमाळा । आवडीं घालीन गुरूच्या गळां ।
गुरु झेलिती लीलाकमळा । त्या करकमळा मी होईन ॥५४॥
गुरूसी नीराजन करिती । ते मी निजतेजें उजळीन ज्योती ।
गुरु जेणें प्रकाशें चालती । ते दीपकादीप्ति मी होईन ॥५५॥
जीवभावाचें निंबलोण । गुरूसी मी करीन आपण ।
इडापीडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥५६॥
मी छत्र मी छत्राकारू । मी चवर मीचि चवरधरू ।
मीचि विंजणा मीचि विंजणेवारू । गुरूचा परिवारू मी होईन ॥५७॥
गुरु करिती आरोहण । तो मी होईन श्यामकर्ण ।
गुरूचा भरभार सहावया जाण । वाजीवाहन होईन मी ॥५८॥
गुरूपुढें मी वाटसुभटू । गुणवर्णनीं मी गर्जता भाटू ।
गुरुगृहीं शांतिपाठू । पढता भटू मी होईन ॥५९॥
मीचि बारी मी कर्हेरी । मी हडपी मी फुलारी ।
मी झाडणा मी खिल्लारी । मी द्वारपाळ द्वारीं होईन ॥५६०॥
गुरु जेथें देती अवधान । ते ते कळा मी होईन जाण ।
गुरूवेगळा अर्ध क्षण । गेला प्राण तरी न वचें ॥६१॥
गुरु सांगती जे कथा । तेथ मी होईन सादर श्रोता ।
गुरुकृपा मी होईन वक्ता । निजात्मता बोलका ॥६२॥
गुरु गंभीर दान देता । तेथ दीन होईन मागता ।
मी होईन दान वाटिता । सादर एकांता होईन ॥६३॥
गुरु बैसती सावकाश । तैं मी होईन अवकाश ।
गुरुहृदयींचें चिदाकाश । निरवकाश मी होईन ॥६४॥
गुरु बैसती आपण । तें मी होईन सुखासन ।
तें मीचि वाहेन आपण । भोई होईन चालणा ॥६५॥
स्वामी सूनियां दिठी । चपळ पाउलांच्या नेटीं ।
चालेन मी उठाउठी । धुरेसी गोठी सांगत ॥६६॥
आंतुले दृष्टीं पुढिले चालीं । गोवींचें पाऊल उगवोनि घालीं ।
उंच नीच भूमीची खोली । चुकवूनि चालीं चालेन ॥६७॥
संकल्पविकल्पांचे झोंक । ज्यात वाम सव्य अनेक ।
ते आवरूनियां देख । पाहत श्रीमुख चालेन मी ॥६८॥
न चुकतां निजमार्ग । न्याहाळूनि धुरेचें आंग ।
न करितां आणिकांचा पांग । भोई चांग मी होईन ॥६९॥
सुखासनाचेनि पडिपाडें । चालतां सुख अधिक वाढे ।
मागीस सूड काढूनि पुढें । सुखसुरवाडें चालेन ॥५७०॥
चढणें पडणें अडखळणें । दडकणें फडकणें अडकणें ।
सांभाळूनियां निष्ठेनें । टणकपणें चालेन ॥७१॥
उरीं शिरीं खांदीं कोंपरीं । मागील सूड पुढें धरीं ।
दृष्टी ठेऊनि पायांवरी । निर्विकारी चालेन ॥७२॥
आटी मुरडी उलट लोट । धापकांप पडे मेट ।
आधार धरूनि सुभट । चढती वाट चालेन ॥७३॥
उल्लंघूनि कामाचा पाट । आंवरूनि क्रोधाचा लोट ।
चुकवूनि खोलव्याची वाट । धुरेसकट मी चालेन ॥७४॥
ममतेची ओल प्रबळ । ते ठायीं रुती गुंती सबळ ।
तेथ न माखतां पाउल । लंघूनि तत्काळ जाईन ॥७५॥
मोहनदीची थोर कराडी । माजीं सबळ जळें प्रबळ वोढी ।
शिंतोडा न लगतां धूर मी काढीं । परापर थडी तत्काळ ॥७६॥
दृष्टी ठेऊनि स्वामीकडे । सवेग चालतां मागेंपुढें ।
भोई होईन दोहींकडे । सूड सुडें काढीन ॥७७॥
एवं मीचि मी मागें पुढें । सुखासनाचेनि सुरवाडें ।
स्वामीची निजनिद्रा न मोडे । तेणें पडिपाडें वाहेन ॥७८॥
उच्छिष्ट अन्नाचा पोसणा । आठां प्रहरांचा जागणा ।
सदा गुरुगुरु करीत जाणा । गुरुद्वारीं सुणा मी होईन ॥७९॥
विजाती देखोनि नयना । सोहं भावें भुंकेन जाणा ।
भजनथारोळा बैसणा । गुरुद्वारी सुणा मी होईन ॥५८०॥
ऐसऐसिया भावना । गुरुसेवेलागीं जाणा ।
अतिशयें आवडी मना । नाना विवंचना विवंची ॥८१॥
जरी दैववशें दूर गेला । परी तो भावबळें जवळी आला ।
गुरुसेवे जो जीवें विकला । तो शास्त्र पावला सद्विद्या ॥८२॥
असो जवळी अथवा दूरी । परी गुरुभक्तीची आवडी भारी ।
जीवित्व ठेविलें सेवेवरी । गुरूच्या द्वारीं भजनासी ॥८३॥
ऐसा गुरुभक्तीसी सादर । चढत्या आवडीं एकाग्र ।
तेंचि सद्विद्यालक्षण शस्त्र । गुरुकृपाकुठार पैं पावे ॥८४॥
लावोनि वैराग्याचे साहाणे । प्रत्यावृत्तिबोधकपणें ।
शस्त्र केलें जी सणाणें । तीक्ष्णपणें अतिसज्ज ॥८५॥
शस्त्र सजिलें निजदृष्टीं । दृढ धरिलें ऐक्याचे मुष्टीं ।
शस्त्र आणि शस्त्रधरा एकी गांठी । करूनि उठी भवच्छेदा ॥८६॥
दृढ साधोनियां आवो । निजबळें घालितां घावो ।
झाला भववृक्षाचा अभावो । घायेंवीण पहा हो छेदिला ॥८७॥
जीवाशयाची वासना । ते छेदावी निजकल्पना ।
तोचि भववृक्षाचा छेदू जाणा । सावधाना धृतिबळें ॥८८॥
झालिया चैतन्यपदप्राप्ती । सकळ साधनें सहजें जाती ।
भोजनीं झालिया पूर्ण तृप्ती । ठायींच राहती पक्वान्नें ॥८९॥
परमतृप्ती उथळल्या पोटीं । अमृतही न लावी ओंठीं ।
तेवीं ब्रह्मपद पावल्यापाठीं । साधनआटाटी सांडती ॥५९०॥
हाचि भावो धरोनि चित्तीं । मागां सांगीतलें तुजप्रती ।
सांडीं साधनव्युत्पत्ती । प्रवृत्तिनिवृत्तीसमवेत ॥९१॥
पावलिया परब्रह्म । मिथ्या वेदोक्त सकळ कर्म ।
मिथ्या आश्रमादि वर्णधर्म । हें त्यागितें वर्म कर्माचें ॥९२॥
स्वप्नीं चालतां लवडसवडीं । जो अडखळूनि पडला आडीं ।
तो जागा होऊनि आपणातें काढी । तैसी वृथा वोढी साधनीं ॥९३॥
पीक आलिया घुमरी । ते शेतीं कोण नांगर धरी ।
गजांतलक्ष्मी आलिया घरीं । भीक दारोदारीं कोण मागे ॥९४॥
हातीं लागलिया निधान । नयनीं कोण घाली अंजन ।
साधलिया निजात्मज्ञान । वृथा साधन कोण सोसी ॥९५॥
अंगीकारोनि ज्ञानशक्ती । केलीं संसारनिवृत्ति ।
ते हे त्यागावी निजवृत्ती । जाण निश्चतीं उद्धवा ॥९६॥
अग्निस्तव निपजे अन्न । तें वाफ न जिरतां परमान्न ।
पोळी अवशेष तापलेपण । रांधितेंहीं जाण चवी नेणे ॥९७॥
आंबया पाडु लागला जाण । तरी अंगीं असे आम्लपण ।
सेजेसी मुरालिया मघमघोन । न चाखतां घ्राण चवी सांगे ॥९८॥
सेजे मुरावयाची गोठी । तेथ न व्हावी द्वैताची दिठी ।
येरयेरां जाहलिया भेटी । दोनी शेवटीं ठिकाळती ॥९९॥
ठिकाळलीं सेजे घालिती । तत्संगें आणिकें नासती ।
निश्चळ राहिल्या एकांतीं । परिपाकपूर्ती घ्राण सांगे ॥६००॥
शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।
शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥
गरोदरीसी प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये ।
तेही बारावळी जैं पाहे । तैं भोगूं लाहे पुत्रसुख ॥२॥
पुरुष निमोनियां जाये । त्या देहाचें दहन होये ।
तरी अवशेष सुतक राहे । तें गेलिया होये निजशुद्धी ॥३॥
तेवीं जावोनियां अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान ।
तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदें ॥४॥
खैराचा शूळ तत्त्वतां मारी । मा चंदनाचा काय आन करी ।
तेवीं अभिमान दोहींपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञानें ॥५॥
लोखंडाची बेडी तोडी । आवडीं सोनियाची जडी ।
चालतां तेही तैसीच आडी । बाधा रोकडी जैसी तैसी ॥६॥
'ब्रह्महमस्मि' हा अभिमान । शुद्ध ब्रह्म नव्हे जाण ।
अहंपणें तेंही कठिण । तेंचि लक्षण अवधारीं ॥७॥
जळापासोनि लवण होये । तें जळींचें जळीं विरोनि जाये ।
मोतीं झालें तें कठिण पाहें । उदकीं न जाये विरोनी ॥८॥
मुक्तपणें मोला चढलें । तें वनिताअधरीं फांसा पडिलें ।
मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें अभिमानें ॥९॥
तेवीं अज्ञानअभिमान आहे । तो सर्वथा तत्काळ जाये ।
ज्ञानाभिमान कठिण पाहें । गोंविताहे मुक्तत्वें ॥६१०॥
अपक्व घटू तत्काळ गळे । तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे ।
भाजिलें खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वें ॥११॥
प्रपंच अज्ञानें झाला लाठा । ज्ञानअज्ञानांचा सत्ववांटा ।
फेडूनि कांटेन कांटा । दोनी आव्हांटा सांडावे ॥१२॥
जरी सांडिले वाटेवरी । तरी अवचटें आपणासीचि बाधु करी ।
यालागीं सांडावे दूरी । निजनिर्धारीं हा त्यागू ॥१३॥
जेथवर अहंपण । तेथवरी बद्धकता जाण ।
शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥१४॥
उद्धवा तुजकरितां माझी भक्ती । झाली माझ्या निजपदाची प्राप्ती ।
आतां नाना साधनउपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥
सद्भावें करितां माझें भजन । तूं झालासी ब्रह्मसंपन्न ।
आतां सद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेंसीं सांडीं पां ॥१६॥
'तस्मादुद्धव उत्सृज्य' । ये श्लोकींचें हें त्यागबीज ।
विशद सांगीतलें म्यां तुज । निजगुज हृदयस्थ ॥१७॥
सकळां साधनां श्रेष्ठ साधन । शिष्यासी सद्गुरुचे भजन ।
तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥१८॥
जो भावें भजे गुरुचरणीं । तो नांदे सच्चिदानंदभुवनीं ।
हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणीं न धरावा ॥१९॥
ऐसें बोलोनि श्रीहरी । आवडीं चारी बाह्या पसरी ।
उद्धवातें प्रीतिकरीं । हृदयीं धरी स्वानंदें ॥६२०॥
देवें सद्भक्ता क्षेम दीधलें । निजहृदयीं हृदय एक झालें ।
सांगणें पुसणें सहज ठेलें । बोलणें बोलें प्राशिलें ॥२१॥
चहूं वाचां पडलें मौन । जीवू विसरला जीवपण ।
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्भक्तां ॥२२॥
तेचि सद्भक्तीचा भावार्थ । विशद बोलिला बाराव्यांत ।
निजभावें श्रीकृष्णनाथ । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥
निजात्मप्राप्तीचें कारण । केवळ भावार्थचि जाण ।
भावार्थावेगळें साधन । वृथा जाण परिश्रमू ॥२४॥
जप तप यज्ञ दानें । भावार्थालागीं करणें ।
तो भावार्थ लाहिजे जेणें । धन्य जिणें तयाचें ॥२५॥
धन्य नरदेहाची प्राप्ती । धन्य साधूची संगती ।
धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्भक्तीं रंगले ॥२६॥
जे रंगले भगवत्पथा । त्यांचें चित्त विसरलें विषयावस्था ।
ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाथा पुसेल ॥२७॥
तें अतिरसाळ निरूपण । केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान ।
श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकाराटीकायां द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक २४ ॥ ओंव्या ६२८ ॥