श्लोक २५ वा
यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।
धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥२५॥
आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।
माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥२५॥
मद्रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।
माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥२६॥
सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।
निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥२७॥
होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।
सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥२८॥
स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।
वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥२९॥
वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।
चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥३३०॥
मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।
जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥३१॥
निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।
अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥३२॥
जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।
माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भक्तां ॥३३॥
ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥३४॥