श्लोक ५ वा
याः काश्च भूमौ दिवि वै रसायां विभूतयो दिक्षु महाविभूते ।
ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते नमामि ते तीर्थपदाङ्घ्रिपद्मम् ॥५॥
स्वर्गमृत्युपाताळ स्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती ।
त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥९९॥
ऐसा करोनियां प्रश्न । उद्धवें घातले लोटांगण ।
सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥१००॥
ऐकोनी उद्धवाच्या प्रश्नासी । परम संतोषे हृषीकेशी ।
पुरस्करोनि उद्धवासी । काय त्यासी बोलिला ॥१॥
जो वैरिगजयूथ पंचानन । कोदंडदीक्षाप्रतापगहन ।
सखा जिवलग पढियंता जाण । जीवप्राण जो माझा ॥२॥
ज्याचें रथींचे मी धुरेवरी । ज्याच्या अश्वांचे वाग्दोरे धरीं ।
जो उपदेशिला कुरुक्षेत्रीं । उभय सेनेमाझारी रणांगणीं ॥३॥
तो नरावतार अर्जुन । त्याच्याऐसा तुझा हा प्रश्न ।
ऐसे उद्धवासी संतोषोन । काय श्रीकृष्ण बोलिला ॥४॥