श्लोक १२ वा
शैली दारुमयी लौही, लेप्या लेख्या च सैकती ।
मनोमयी मणिमयी, प्रतिमाष्टविधा स्मृता ॥१२॥
अष्टधा प्रतिमास्थिती । ज्या पूजितां सद्यःश्रेय देती ।
ऐशिया प्रतिमांची जाती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९८॥
गंडक्यादि ’शिळामूर्ती’ । कां दारु मांदार ब्रह्म ’काष्ठमूर्ती’ ।
अथवा सुवर्णादि ’धातुमूर्ती’ । सद्यः फळती साधकां ॥९९॥
मृत्तिकाकापडकीटणमूर्ती । या नांव ’लेप्या’ म्हणिजेती ।
कां स्थंडिलीं लिहिल्या अतिप्रतीं । त्या ’लेख्या’ मूर्ती पूजकां ॥१००॥
वाळुवेची जे केली मूर्ती । ती नांव ’सिकतामूर्ति’ म्हणती ।
तेही पूज्य गा निश्चितीं । सुवर्णमूर्तीसमान ॥१॥
मूर्ति ’रत्नमयी’ सोज्ज्वळ । हिरा मरकत इंद्रनीळ ।
पद्मराम मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥२॥
मूर्तींमाजीं अतिप्राधान्य । ’मनोमयी’ मूर्ति पावन ।
जिचें करितां उपासन । समाधान साधकां ॥३॥;
तेंचि प्रतिमापूजाविधान । स्थावरजंगमलक्षण ।
तेही अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥४॥