श्लोक ३८ वा
अहमेतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः ।
मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।
सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥३८॥
एवं 'पंचवीसतत्त्वसंख्यान' । तें अवघें मीचि जाण ।
या गणण्याचें गणितें 'ज्ञान' । तेंही मी आपण म्हणे देवो ॥७७॥
हेंही जाणतें जें लक्षण । तेंही देवो म्हणे मी आपण ।
मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥७८॥
जीव आणि ईश्वर । गुणी आणि गुणावतार ।
क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥७९॥
मजवेगळें अणुमात्र । उरलें नाहीं गा स्वतंत्र ।
मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ 'चिन्मात्र' तेंही मी ॥२८०॥
मजवेगळें येथें कांही । उद्धवा गा उरले नाही ।
सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥८१॥
उद्धवा ऐसें म्हणसी कांही । 'संक्षेपु न करावा पाहीं' ।
विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥८२॥