श्लोक ३८ वा
प्रत्यर्पितो मे भवताऽनुकम्पिना, भृत्याय विज्ञानमयः प्रदीपः ।
हित्वा कृतज्ञस्तव पादमूलं, कोऽन्यत्समीयाच्छरणं त्वदीयम् ॥३८॥
तुझी संनिधिमात्र देख । समूळ अज्ञानासी घातक ।
हेंचि मुख्यत्वें आवश्यक । भक्त सात्त्विक जाणती ॥८५॥
असो इतरांची गोष्टी । म्यांही अनुभविलें निजदृष्टीं ।
अविद्या निरसावया सृष्टीं । सत्संगती लाठी सर्वार्थीं ॥८६॥
सत्संगाहीमाजीं जाण । तुझी संगती अतिपावन ।
तुवां उद्धरावया दीनजन । हें निजात्मज्ञान प्रकाशिलें ॥८७॥
माझें निमित्त करुनि जाण । उद्धरावया दीन जन ।
त्यांचें निरसावया अज्ञान घन । ज्ञानदीप पूर्ण प्रज्वाळिला ॥८८॥
उपदेशार्थ श्रद्धास्थिती । हेचि टवळें पैं निश्चितीं ।
तेथें बोधिका ज्या निजात्मयुक्ती । तेंचि टवळ्यांप्रती स्नेह पूर्ण ॥८९॥
विवेकवैराग्यधारण । हेंचि तेथील वाती जाण ।
तेथ प्रज्वळिला ज्ञानघन । चित्प्रभापूर्ण महादीप ॥६९०॥
नैराश्य तेंचि वैराग्यधारण । तेथें प्रज्वळे ज्ञानदीप पूर्ण ।
आशा तेंचि माल्हवण । गडद संपूर्ण पडे तेथें ॥९१॥
तो दीप कर्णद्वारीं ठेविला । तंव सबाह्य प्रकाश जाहला ।
अज्ञान अंधार निर्दाळिला । स्वयें प्रबळला सद्रूपें ॥९२॥
तेणें सबाह्यसत्प्रकाशें । तुझी पदवी प्रकट दिसे ।
ऐसें निजरुप हृषीकेशें । अनायासें मज अर्पिंलें ॥९३॥
तुवां अंतर्यामित्वें आपुलें । स्वरुप पूर्वींच मम अर्पिलें ।
तें तुवांच माझारीं आच्छादिलें । भजन आपुलें प्रकटावया ॥९४॥
तुझ्या निजभजनाचें लक्षण । सर्वभूतीं भगवद्भजन ।
तेणें तूं साचार संतोषोन । अर्पिलेंचि ज्ञान अर्पिसी पुढती ॥९५॥
वाढवूनि निजभजन । माझें मज अर्पिसी ज्ञान ।
या नांव ’प्रत्यर्पण’ । साधु सज्ञान बोलती ॥९६॥
वाढवूनि आपुली भक्ती । माझें ज्ञान दिधलें माझे हातीं ।
दिधलें तेथ माया पुढती । विकल्पवृत्ती स्पर्शेना ॥९७॥
जे दिधली स्वरुपस्थिती । ते आच्छादेना कदा कल्पांतीं ।
यापरी गा श्रीपती । कृपा निश्चितीं तुवां केली ॥९८॥
यापरी तूं अतिकृपाळू । निजदासांलागीं दयाळू ।
त्या तुज सांडूनियां बरळू । आनासी गोवळू भजों धांवे ॥९९॥
त्यजूनि स्वामी हृषीकेशु । आना भजेल तो केवळ पशु ।
पशूंहीमाजीं तो रासभेशु । ज्यासी नाहीं विश्वासु हरिभजनीं ॥७००॥
तुवां जनासी केला उपकारु । इंद्रियां पाटव्य ज्ञानाधिकारु ।
तो उपकार विसरे जो नरु । तो जाण साचारु कृतघ्न ॥१॥
जे जाणती तुझ्या उपकारातें । ते काया वाचा चित्तें वित्तें ।
कदा न भजती आनातें । मज निश्चितें मानिलें ॥२॥
मज निमित्त करुनियां जाण । जें त्वां प्रकाशिलें निजात्मज्ञान ।
तेणें जगाचें उद्धरण । श्रवण मनन कीर्तनें ॥३॥
यापरी तूं कृपाळु पूर्ण । माझें छेदिलें भवबंधन ।
तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण स्वयें सांगे ॥४॥