श्लोक ४७ वा
सीदन् वीप्रो वणिग्वृत्त्या पण्यैरेवापदं तरेत् ।
खड्गेन वाऽऽपदाक्रान्तो न श्ववृत्त्या कथंचन ॥४७॥
स्वधर्में पीडितां ब्राह्मणासी । तेणें करावें वणिग्वृत्तीसी ।
कां दुरावले क्षात्रधर्मासी । तेही सदोषी अतिदुष्ट ॥५५॥
ब्राह्मणासी हिंसाकर्म । तो जाण पां परम अधर्म ।
लागल्या अनुपपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥५६॥
करितां वाणिज्यकर्मास । तिळ सर्षप कार्पास ।
कां लवणादि रस तैजस । यांच्या महादोष विक्रयीं ॥५७॥
त्या सोडोनि सदोषां समस्तां । लागावें वाणिज्यपंथा ।
तांबूलपर्णें श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥५८॥
ऐशिया वाणिज्यस्थितीं । ज्याची ढळेना अनुपपत्ती ।
तेणें खड्ग घेऊनि हातीं । क्षात्रवृत्ती करावी ॥५९॥
तेथें चोरावीं ना अंगें । रणीं न सरावें मागें ।
स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावें ॥४६०॥
ऐशिया शुद्ध क्षात्रवृत्तीं । ब्राह्मणें कंठावी अनुपपत्ती ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥६१॥
क्षत्रियांसी स्वधर्में अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थिती ।
तें विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥६२॥