श्लोक ३२ वा
रजः सत्त्वतमोनिष्ठा रजःसत्वतमोजुषः ।
उपासत इन्द्रौख्यान् देवादीन्न तथैव माम् ॥३२॥
रजतमाचेनि उन्मत्तें । सत्व संकीर्ण होय तेथें ।
तेव्हां रजाचेनि संमतें । काम चित्ततें व्यापूनि खवळे ॥२९॥
अतिकाम खवळल्या चित्तीं । गुणनुसारें विषयीं प्रीती ।
तेव्हा सकामाची संगती । धरी निश्चितीं भावार्थें ॥३३०॥
सकामसंगती साचार । काम्यकर्मी अत्यादर ।
स्वर्गभोगीं महातत्पर । यजी देवपितर प्रमथादिक ॥३१॥
मी सर्वात्मा सवेश्वर । त्या माझ्या ठायीं अनादर ।
कामलंपटत्वें नर । देवतांतर उपासिती ॥३२॥
म्हणसी देवतांतर जें कांहीं । तें तूंचि पैं गा सर्वही ।
हाही ऐक्यभावो नाहीं । भेदबुद्धीं पाहीं विनियोग ॥३३॥
एंद्रादि देवद्वारां जाण । मीचि होय गा प्रसन्न ।
त्या माझ्या ठायीं नाहीं भजन । सकाम मन स्वर्गार्थी ॥३४॥
दृढ कामना जडली चित्तीं । सांगतां स्वर्गीं पुनरावृत्ती ।
तेही हितत्वेंचि मानिती । ऐक निश्चितीं अभिप्रावो ॥३५॥