श्लोक ५ वा
छाया प्रत्याह्वयाभासा, ह्यसन्तोऽप्यर्थकारिणः ।
एवं देहादयो भावा, यच्छन्त्यामृत्युतो भयम् ॥५॥
जळीं प्रतिबिंब साच नसे । जो पाहे तो बिंबला दिसे ।
मिथ्या प्रपंचाचें रुप तैसें । निजकल्पनावशें भासत ॥८६॥
तें प्रतिबिंब पाहोनि डोळां । मी म्हणोनि लाविजे टिळा ।
तेवीं देहाभिमानाचा सोहळा । जीवाच्या कपाळा आदळे ॥८७॥
कां आपुलींचि उत्तरें । पडिसादें होतीं प्रत्युत्तरें ।
तें मिथ्याचि परी साचोकारें । श्रवणीं अक्षरें उमटती ॥८८॥
निश्चळ दोराचें निजरुप । भ्रमें भासला प्रचंड सर्प ।
तो मिथ्या परी भयकंप । महाखटाटोप उपजवी ॥८९॥
यापरी असंत देहादिक । देहाभिमानें जीवासी देख ।
जन्ममरणावर्त अनेक । आकल्प दुःख भोगवी ॥९०॥;
’आत्म्यापासोनि देहादि भेद । उपजला हें बोले वेद ।
वेदरुपें तूं प्रसिद्ध । मिथ्या वेदवाद घडे केवीं’ ॥९१॥
ऐसा उद्धवाचा आवांका । वेदवादाची आशंका ।
समूळ कळली यदुनायका । तेंचि उत्तर देखा देतसे ॥९२॥