श्लोक २३ वा
अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे ।
लीयते ज्योतिषि रसो ज्योती रुपे प्रलीयते ॥२३॥
तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडादंडधारा प्रबळा ।
शत वरुषें वर्षतां जळा । सप्तसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥२९॥
तेणें जळ कोंडलें सुबद्ध । ते जळीं पृथ्वीचा विरे गंध ।
तेव्हां जळचि एकवद । प्रळयीं प्रसिद्ध उधवलें पैं ॥५३०॥
सांवर्तक मेघांचें लक्षण । सिंधु एकत्र करिती पूर्ण ।
पृथ्वी विरवूनियां जाण । ते जळीं आपण विरोनि जाती ॥३१॥
ते काळीं अतिदुर्धर । सांवर्ताग्नि खवळे थोर ।
तो जळ शोषी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेष ॥३२॥
रसमात्र जळ उरे तेंही । लीन होय तेजाचे ठायीं ।
तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसंडे ॥३३॥
सांवर्ताग्नीची मातू । जळ शोषूनि राहे निवांतू ।
जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नांव निश्चितू सांवर्तकाग्नी ॥३४॥
तेणेंचि काळें झंझामारुत । उठी तेजातें शोषित ।
तें तेज शोषितां समस्त । उरे तेथ रुप मात्र ॥३५॥