श्लोक १० वा
अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः ।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥१०॥
अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं ।
रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८॥
थोराथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं ।
त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥९९॥
तैसाचि योगिया नेटकु । शास्त्रदृष्टी अतिविवेकु ।
न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकू होतसे ॥१००॥
वेदांतीं ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं ।
इतर स्तोत्रीं ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीतीं मानितू ॥१॥
पंडितांचें वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं ।
तेहीं अतिआदरें मानुनी । सार निवडूनि घेतसे ॥२॥
प्रीती होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासर्यांसी ।
मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥३॥
भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेईजे राजहंसीं ।
तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥४॥
सर्वभूतीं भगवद्भावो । हा सारभागु मुख्य पहा हो ।
हे निष्ठा ज्यासि महाबाहो । त्यासी अपावो स्वप्नीं नाहीं ॥५॥
भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु ।
यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांसु लक्षणें ॥६॥
गुरुत्वें म्यां मानिली माशी । ऐके राया दो प्रकारेंसी ।
एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥७॥