श्लोक ४६ वा
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥४६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण ।
अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥७४॥
जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण ।
जो न देखे गुणदोषभान । तो `ब्रह्मसंपन्न' उद्धवा ॥७५॥
पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण ।
गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥७६॥
ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण ।
जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥७७॥
जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें ।
त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥७८॥
जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी ।
तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥७९॥
आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण ।
हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥५८०॥
जनीं चौर्यांशीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं ।
न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥८१॥
म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं ।
उद्धवा हे गोष्टी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥८२॥
निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें ।
तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥८३॥
साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती ।
तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥८४॥
व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती ।
तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥८५॥
जेवीं कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी ।
परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥८६॥
न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून ।
करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लाक्षण कर्मांचें ॥८७॥
ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाटी ।
साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥८८॥
गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही ।
गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥८९॥
साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण ।
जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥५९०॥
साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे ।
एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥९१॥
गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी ।
हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥९२॥
गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध ।
तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥९३॥
येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण ।
तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥९४॥
तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त ।
स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भुत ते आहे ॥९५॥
संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥५९६॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्उद्धवसंवादे
एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥श्लोक ॥४६॥ओव्या ॥५९६॥