श्लोक १५ वा
दारुको द्वारकामेत्य, वसुदेवोग्रसेनयोः ।
पतित्वा चरणावस्त्रैर्न्यषिञ्चत्कृष्णविच्युतः ॥१५॥
दारुक द्वारका देखत । जैसें का प्राणेंवीण प्रेत ।
का राजा जैसा दैवहत । तैशी दिसत काळाहीन ॥८१॥
जेवीं का वनिता पतिवीण । सर्वार्थीं दिसे दीन ।
तैशी द्वारावती जाण । कळाहीन आभासे ॥८२॥
रस पिळिल्या जैसा ऊंस । कणेवीण फळकट भूस ।
तैशी श्रीकृष्णेवीण उद्धस । दिसे चौपास द्वारका ॥८३॥
दारुक प्रवेशे राजभुवन । देखोनि वसुदेव उग्रसेन ।
अश्रुधारा स्त्रवती नयन । आक्रंदोनि चरण धरिले त्यांचे ॥८४॥
कृष्णवियोगें तापला पूर्ण । जैसें अतिसंतप्त जीवन ।
तैसे अश्रुधारा स्त्रवती नयन । तेणें पोळती चरण वसुदेवाचे ॥८५॥
उकसाबुकसीं फुंदे पोट । दुःखें होऊं पाहे हृदयस्फोट ।
जिव्हेसी बोबडी, वाळले ओंठ । सद्गदें कंठ दाटला ॥८६॥
बोल न बोलवे सर्वथा । देखोनि दारुकाची व्यथा ।
द्वारकेच्या जनां समस्तां । अतिव्याकुलता वोढवली ॥८७॥
देवकी आणि रोहिणी । आल्या अत्यंत हडबडोनी ।
अतिव्याकुलता देखोनि । कृष्ण पत्नी तेथें आल्या ॥८८॥
राणीवसाचिया नरनारी । धांवल्या सभामंडपाभीतरीं ।
तंव दारुकाची अवस्था भारी । देखोनि जिव्हारीं दचकल्या ॥८९॥
स्फुंदतां उपसाबुकसीं । श्वास परतेना दारुकासी ।
सांगतां कृष्णवियोगासी । मूर्च्छा त्यासी पैं आली ॥१९०॥
तेथें वसुदेव उग्रसेन । करुनि त्याचें सांतवन ।
वृत्तांत पुसतां सावधान । काय तो वचन बोलिला ॥९१॥