श्लोक १३ वा
त्वया परमकल्याण पुण्यश्रवणकीर्तनः ।
स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥१३॥
ज्याचेनि श्रवणें वाढे पुण्य । ज्याचेनि नामें झडे भवबंधन ।
तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥२२॥
तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण ।
मज तुझा हा उपकार पूर्ण । तूं परम कल्याण वसुदेवा ॥२३॥;
आशंका ॥ ऐकोनि नारदाचें वचन । झणें विकल्प धरील मन ।
यासी पूर्वी होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्नें ॥२४॥
ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । ते जाणावे निजात्मघाती ।
तेही अर्थीची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥२५॥
अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो धृतावदानें अति प्रकाशे ।
तेवीं सप्रेम प्रश्नवशें । सुख उल्लासे मुक्तांचें ॥२६॥
सप्रेम भावार्थें मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा ।
तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥२७॥
यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्में निवती संपूर्ण ।
तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥२८॥;
जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ ।
सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥२९॥