श्लोक ८ वा
श्रीभगवानुवाच -
हन्त ते कथयिष्यामि, मम धर्मान् सुमङगलान् ।
यान् श्रद्धयाचरन्मर्त्यो मृत्युं जयति दुर्जयम् ॥८॥
जो प्रणवाचें सोलींव सार । जो ज्ञानाचें निजजिव्हार ।
जो चैतन्याचा चमत्कार । जो परात्पर परादिकां ॥१२॥
तो मेघगंभीर गर्जोनी । स्वानंदें बोले शार्ङगपाणी ।
म्हणे उद्धवा तुझी धन्य धन्य वाणी । तुझ्या प्रश्नीं मी निवालों ॥१३॥
बाळ्याभोळ्या ब्रह्मप्राप्ती । पावावया सुगमस्थितीं ।
ये अर्थीं दाटुगी माझी भक्ती । तिसी मी श्रीपती सदा वश्य ॥१४॥
माझें करितां अनन्य भजन । मी सर्वथा भक्ताधीन ।
तेथ जाती गोत ज्ञातेपण । उंच नीच वर्ण मी न म्हणें ॥१५॥
जेणें घडे भजन परम । ते सांगेन भागवतधर्म ।
जेणें निरसे कर्माकर्म । मरणजन्मच्छेदक ॥१६॥
जे धर्म स्वयें आचरितां । समूळ उन्मळी भवव्यथा ।
ज्या धर्मांच्या स्वभावतां । सुखसंपन्नता साधकां ॥१७॥
जे स्वयें धर्म स्तवितां । निरसी असत्यादि दोषकथा ।
जे धर्म सादरें ऐकतां । विषयावस्था निर्दळी ॥१८॥
माझे धर्म अतिसुमंगळ । दोषदाहक कलिमळ ।
मंगळांचेंही परम मंगळ । भजन केवळ पैं माझें ॥१९॥
श्रद्धेनें आचरतां माझे धर्म । माझ्या निजरुपीं उपजे प्रेम ।
तेणें हारपे भवभ्रम । मरणजन्म असेना ॥२२०॥
जो मृत्यु ब्रह्मयाचा ग्रास करी । हरिहरांतें मृत्यु मारी ।
मृत्यु दुर्जय संसारीं । सुरासुरीं कांपिजे ॥२१॥
त्या मृत्यूचें खणोनि खत । पाडूनि कळिकाळाचे दांत ।
अद्वयभजनें माझे भक्त । सुखें नांदत संसारीं ॥२२॥
जेणें निवारे दुर्जय मरण । ऐसें भजन म्हणसी कोण ।
ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥२३॥
उद्धवा तूं माझा निजसखा । यालागीं निजभजन आवांका ।
आरंभूनि पूर्वपीठिका । संक्षेपें देखा सांगेन ॥२४॥
कोटिशस्त्रें रुपल्या पाहें । तरी शूर वांचला राहे ।
तोचि वर्मीचेनि एके घायें । मरण लाहे तत्काळ ॥२५॥
तेवीं करितां नानासाधन । अनिवार्य जन्ममरण ।
त्यासी माझें हें संक्षेपभजन । समूळ जाण निर्दळी ॥२६॥
कृष्ण घनश्याम महाघन । उद्धवचातकालागीं जाण ।
वर्षला स्वानंदजीवन । तेणें त्रिभुवन सुखी होये ॥२७॥
लोटलिया वर्षाकाळ । शारदीचें निर्मळ जळ ।
तेवीं सुखाचे सुखकल्लोळ । भजनें प्रबळ एकुणतिसावा ॥२८॥
एकादशाचिया अंतीं । सुगमत्वें ब्रह्मप्राप्ती ।
तदर्थीं उत्तमोत्तम भक्ति । स्वमुखें श्रीपति सांगत ॥२९॥