श्लोक १६ वा
स्नानालङकरणं प्रेष्ठमर्चायामेव तूद्धव ।
स्थण्डिले तत्त्वविन्यासो, वह्नावाज्यप्लुतं हविः ॥१६॥
सूर्ये चाभ्यर्हणं प्रेष्ठं, सलिले सलिलादिभिः ।
प्रतिमामूर्ति पूजास्थान । ते मूर्तीस जें महास्नपन ।
या नांव बोलिजे ’स्नान’ । साङग भूषण मुकुटादी ॥३१॥
जे लोकीं उत्तम प्रकार । कां आपणासी जे प्रियकर ।
जे जे अनर्घ्य अळंकार । तेणें श्रद्धा मी श्रीधर पूजावा ॥३२॥
स्नान भोजन अलंकार । साङग पूजा सपरिकर ।
हा प्रतिमा पूजाप्रकार ।; ऐक विचार स्थंडिलाचा ॥३३॥
स्थंडिलीं जें पूजास्थान । तेथ तत्त्वांचें धरोनि ध्यान ।
करावें तत्त्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥३४॥
आत्मतत्त्वादि तत्त्वविवंच । स्थंडिलीं विवंचूनि साच ।
हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंच निजपूजा ॥३५॥;
अग्नीचे ठायीं जें पूजन । तेथ माझें करुनि ध्यान ।
आज्यप्लुत हविहवन । हें पूजाविधान अग्नीचें ॥३६॥
अग्नि देवांचें वदन । येणें विश्वासें संपूर्ण ।
हविर्द्रव्य करितां हवन । ’अग्निपूजन’ या हेतू ॥३७॥;
सूर्याच्या ठायीं प्रकाशमान । मंडळात्मा सूर्यनारायण ।
तेथ सौरमंत्रें उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥३८॥;
विचारितां श्रुतीचा अर्थ । ’आपोनारायण’ साक्षात् ।
येथ पूजाविधान यथोक्त । जळीं जळयुक्त तर्पण ॥३९॥;
’हृदयीं ’ जें माझें पूजास्थान । तेथें मनें मनाचें अर्चन ।
मनोमय मूर्ति संपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥१४०॥;
माझें मुख्यत्वें अधिष्ठान । ब्रह्ममुर्ति जे ’ब्राह्मण’ ।
तेथील जें पूजाविधान । आज्ञापालन दासत्वें ॥४१॥;
ब्रह्मासी ज्याचेनि ब्रह्मपण । तो ’सद्गुरु’ माझें पूजास्थान ।
सर्वार्थीं श्रेष्ठ पावन । तेथील पूजन तें ऐसें ॥४२॥
जीवें सर्वस्वेंसीं आपण । त्यासी रिघावें अनन्य शरण ।
त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥४३॥
गुरुची नीचसेवा सेवन । आवडीं करणें आपण ।
हेंचि तेथील पूजाविधान । येणें सुखसंपन्न साधक ॥४४॥
सद्गुरुसेवा करितां पाहीं । ब्रह्मसायुज्य लागे पायीं ।
गुरुसेवेपरतें कांहीं । श्रेष्ठ नाहीं साधन ॥४५॥
सद्गुरुस्वरुप तें जाण । अखंडत्वें ब्रह्म पूर्ण ।
तेथें आवाहन विसर्जन । सर्वथा आपण न करावें ॥४६॥
निष्कपटभावें संपूर्ण । सद्गुरुसी जो अनन्य शरण ।
त्याचे मीही वंदीं चरण । येथवरी जाण तो धन्य ॥४७॥
निर्लोभभावें सहज । पूजितां तोषे अधोक्षज ।
त्या भावाचें निजगुज । स्वयें यदुराज सांगत ॥४८॥