श्लोक ३२ वा
अहं त्रिवृन्मोहविकल्पहेतुर्वैकारिकस्तामस ऐन्द्रियश्च ॥३२॥
आत्मा परिज्ञानमयो विवादो ह्यस्तीति नास्तीति भिदाऽर्थनिष्ठः ।
अहंअध्यासें संसारप्राप्ती । जीवासी लागली निश्चितीं ।
त्या अहंकाराचे निवृत्तीं । भवनिर्मुक्ती जीवासी ॥७३॥
ऐसा बाधकत्वें दुर्धर । कैंचा उठिला अहंकार ।
हाही पुसों पाहसी विचार । ऐक साचार सांगेन ॥७४॥
स्वस्वरुपातें विसरुन । दृढ जें स्फुरे मीपण ।
तोचि अहंकार जाण । विकारें त्रिगुणक्षोभक ॥७५॥
जागृतीचा जो विसरु । तोचि स्वप्नसृष्टीचा विस्तारु ।
वस्तुविमुख जो अहंकारु । तोचि संसारु त्रिगुणात्मक ॥७६॥
विकारें क्षोभती तिन्ही गुण । हें विस्मरण मोहाचें लक्षण ।
तेणें विकारले तीन गुण । ते विभाग भिन्न अवधारीं ॥७७॥
मूळीं बोलिला वैकारिक । तो अहंकार जाण सात्त्विकू ।
तो चित्तचतुष्टयद्योतूक । होय प्रकाशकू अधिदैवें ॥७८॥
सत्त्वापासोनि उपजे मन । मनापासाव विकार गहन ।
यालागीं वैकारिक जाण । सत्त्वगुण बोलिजे ॥७९॥
ज्ञान कर्म उभय पंचक । हा इंद्रियांचा दशक ।
जाहला रजोगुण द्योतक । यालागीं ऐंद्रियक म्हणिपे त्यासी ॥३८०॥
तामस गुण जो कां येथें । आकाशादि पंचीकृतें ।
आवरणरुपें महाभूतें । विषयसमवेतें उपजवी ॥८१॥
महाभूतें विषयपंचक । झाला तमोगुण प्रकाशक ।
यालागीं भूतादि देख । यासी आवश्यक बोलिजे ॥८२॥
एवं त्रिगुणगुणविकारें । काम्यकर्मसंस्कारें ।
सबळ होऊनि अहंकारें । संसारीं संचरे नाना हेतु ॥८३॥;
या प्रकृतिविकारांपासून । आत्मा अतिशयें भिन्न ।
जेवीं मृगजळातें भरुन । अलिप्त भानू नभामाजीं ॥८४॥
जैसा प्रकाशोनि सर्पाकार । सर्पासी नातळे स्वयें दोर ।
तेवीं प्रकाशोनि संसार । निःसंग निर्विकार निजात्मा ॥८५॥
जेवीं कृष्ण पीत रक्त श्वेत । स्फटिक ठेवितां तेथतेथ ।
जरी तदाकार भासत । तरी तो अलिप्त शुद्धत्वें ॥८६॥
तैसा गुणसंगें जीवात्मा बद्ध । दिसे तरी तो अतिशुद्ध ।
हा नेणोनियां निजबोध । करिती विवाद मतवादी ॥८७॥
एक म्हणती आत्मा देही । एक म्हणती तो विदेही ।
एक म्हणती आत्म्याच्या ठायीं । हे दोन्ही नाहीं सर्वथा ॥८८॥
एक म्हणती आत्मा सगुण । एक म्हणती तो गुणविहीन ।
एक म्हणती ते वेगळी खूण । सगुण निर्गुण परमात्मा ॥८९॥
एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादिती अभेद ।
एक म्हणती दोन्ही अबद्ध । आमुचें मत शुद्ध देहात्मवादू ॥३९०॥
एक म्हणती हें मिथ्याभूत । प्रत्यक्ष दिसताहे जो येथ ।
तो प्रपंच मानिती सत्य । हेंचि मत एकाचें ॥९१॥
ऐसे भेदवाद सकळ । विचारितां अज्ञानमूळ ।
आत्मा चिन्मात्र केवळ । भेदातें समूळ छेदक ॥९२॥
’आत्मा परिज्ञानमय’ शुद्ध । हें श्लोकींचें मूळ पद ।
तेणें निरसे अज्ञानभेद । आत्मा शुद्ध बुद्ध चिदात्मा ॥९३॥
जेवीं सनक्षत्र रजनी । निवटीत प्रकटे तरणी ।
तेवीं सभेद कार्य निरसूनी । प्रकट चित्किरणीं चिद्भानू ॥९४॥
तेथ गुणेंसी माया उडे । भेदासहित वाद बुडे ।
मूळासह अज्ञान खुडे । चहूंकडे सच्चिदानंद ॥९५॥
आत्मा सच्चिदानंद पूर्ण । तेथ सकळ मिथ्या अज्ञान ।
तें अज्ञाननिरासीं साधन । विवेक सांख्यज्ञान व्यर्थ दिसे ॥९६॥
तेचि विषयींचें निरुपण । श्र्लोकार्धें सुलक्षण ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । साध्यसाधनविभाग ॥९७॥;