श्लोक १३ वा
केतुस्त्रिविक्रमयुतस्त्रिपतत्पताको । यस्ते भयाभयकरोऽसुरदेवचम्वोः ।
स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन् । पादः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥१३॥
बलिबंधनीं अनंता । त्रिविक्रमचरणु वाढतां ।
सत्यलोकाही वरुता । दिसे झळकता श्रीचरणु ॥५४॥
चरणु वाढला सर्वांवरी । तो 'केतु' बोलिजे कवीश्वरीं ।
पताका झळकत कवणेपरी । सुरसरी निजगंगा ॥५५॥
बलिबंधनीं आवेश । चरण उचलिला दुराश ।
नखें भेदला आवरणकोश । जळ बहुवस चालिलें ॥५६॥
चरणस्पर्शें भगवंता । जाहली जीवनासी पवित्रता ।
ब्रह्मा कमंडलीं धरितां । शिवें माथां वाहिली ॥५७॥
चरणध्वजीं पताका ते गंगा । त्रिवाहिनी त्रिपथगा ।
चरणशोभा श्रीरंगा । नयनभृंगा उल्हासु ॥५८॥
केतु झळकलिया पाठीं । आसुरी सेनेसी भय उठी ।
दैवी संपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥५९॥
आणिक चरणाची कथा । देवांसी स्वर्गसुखदाता ।
तोच चरणु अधर्मवंतां । होय तत्वतां नरकहेतु ॥१६०॥
एक तरले चरण पूजितां । एक तरले चरण ध्यातां ।
चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ॥६१॥
चरण वंदिती कां निंदिती । ते निजपदाप्रती जाती ।
सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयांसी ॥६२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां उद्धरिलें शिशुपाळा ।
जे उपेक्षिती चरणकमळा । तयां खळां रौरव ॥६३॥
ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका ।
आमुच्या सकळ पातकां । क्षणार्थें देखा उद्धारु ॥६४॥
जेथ पापाचा जाहला उद्धारु । तेथ सहजचि खुंटला दुराचारु ।
ऐसा तरावया संसारु । चरण साचारु पैं तुझा ॥६५॥