श्लोक ५७ वा
क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा ।
ताडितः सन्निबद्धो वा वृत्त्या वा परिहापितः ॥५७॥
देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन ।
तिंहीं साधूंसी करितां छळण । शांतीस्तव सज्जन क्रोधी नव्हती ॥६८॥
अल्पउपद्रवीं जाण । न येती क्रोधा सज्ञान ।
तैसें नव्हे अतिनिर्वाण । पीडा दारुण करितांही ॥६९॥
कायिक वाचिक मानसिक । त्रिविध पीडा देतां देख ।
साधु निजशांतीं नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥६७०॥
उजू बोलतां शुद्ध युक्ती । आक्षेपूनि हेडाविती ।
झिडकावूनियां निर्भर्त्सिती । अपमानिती सभेसी ॥७१॥
शब्दीं शब्दाचे करुनि छळ । म्हणती दुष्ट दुर्जन दुःशीळ ।
अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥७२॥
ऐशा दुर्जनांच्या दुष्टोक्ती । साधु साहे निजशांती ।
ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥७३॥
पराची जिव्हा वोठ हालती । माझ्या अंगीं ते न रुपती ।
यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांती ढळेना ॥७४॥
सभेसी सन्मानें पूजितां । लोटूनि घातला खालता ।
हाणोनियां चरणघाता । नेला परता अपमानें ॥७५॥
सन्मानें जेथ पूजूं नेती । तेथ केवळ असे क्षिती ।
अपमानें जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पैं ॥७६॥
येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण ।
ऐसेनि विवेकें सज्जन । द्वेषीना जन निजशांती ॥७७॥
प्रलोभूनि नाना युक्ती । धनें ठकवूनियां निर्भर्त्सिती ।
धनलोभ केवळ अधःपाती । त्याची निवृत्ति जिंहीं केली ॥७८॥
त्यांसी निंदितांचि जाण । दोषी होइजे आपण ।
यालागीं क्रोधा न ये मन। शांति संपूर्ण ढळेना ॥७९॥
शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ ।
त्या अनर्था जो करी निवृत्त । त्यातें द्वेषित ते मूर्ख ॥६८०॥
सद्गुणीं दोष आरोपिती । नानापरी निंदा करिती ।
तेणें हित मानिती चित्तीं । तारक निश्चितीं हे माझे ॥८१॥
मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती बाह्य मळ ।
हे जनक माझे केवळ । सबाह्य मळ सकळ जिव्हाग्रें धुती ॥८२॥
ऐशियांचें करितां छळण । हितास नाडिजे आपण ।
कोणाचे न बोले दोषगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥८३॥
चाले जेणें जीविकास्थिती । धन्य धान्य क्षेत्र वृत्ती ।
छळें बळें हिरोनि नेती । तेणेंही चित्तीं क्षोभ नुपजे ॥८४॥
येथ लाभालाभ दैवाधीन । त्यासी देतेंघेतें तेंचि जाण ।
यालागीं द्वेषीना जन । शांतीचा गुण न सांडी ॥८५॥
वृत्ति घेऊनि उगे नसती । अन्यायी म्हणोनि बांधिती ।
एक तोंडावरी थुंकिती । एक माथां मुतती अतिदुष्ट ॥८६॥
एक ताडिती पाडिती । एक नानापरी गांजिती ।
तरी अंगींची ढळेना शांती । विवेक सांगाती सज्जना ॥८७॥
थुंका आणि जें मृत । तें देहाचिमाजीं उपजत ।
देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥८८॥
थुंका आणि जें मृत । जैसें देहीं उपजे देहाचें अपत्य ।
देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणाचें ॥८९॥
धरितां मारितां म्हणे देख । देहो तितुका पांचभौतिक ।
मारिता मारिजता दोनी एक । कोणाचें दुःख कोणासी ॥६९०॥
ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती ।
त्याचा अंकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥९१॥
तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वें पाळावी शांती ।
ते दुःखसागरावर्ती । होय तारिती सुखरुप ॥९२॥
वैराग्य योग ज्ञान ध्यान । त्याचें फळ तें शांति जाण ।
ते शांति साधूनि संपूर्ण । आपणिया आपण उद्धरिती ॥९३॥
यालागीं उद्धवा जाण । साहोनि द्वंद्वांचें काठिण्य ।
शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥९४॥
पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुंटे गोठी ।
परमानंदें पडे मिठी । भवभयाची तुटी तैं होय ॥९५॥;
ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला । उद्धव अत्यंत चाकाटला ।
द्वंद्वबाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आम्हांसी ॥९६॥
ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवीं देखिजेल दृष्टीं ।
ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुष सृष्टीं नसेल ॥९७॥
मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति त्वां कैंची काढिली ।
हे ऐकतां तुझी बोली । भयें दचकली बुद्धि माझी ॥९८॥
ऐशी शांति ज्यासी आहे । तो मागें झाला ना पुढें होये ।
देवो बोलिला निजनिर्वाहें । तें दुःसह होये आम्हांसी ॥९९॥
ज्या सांगीतलें द्वंद्वासी । तें अतिदुःसह योगियांसी ।
केवीं साहवे आम्हांसी । तेंचि देवासी पूसत ॥७००॥