श्लोक ३३ वा
पूर्वं गृहीतं गुणकर्मचित्रमज्ञानमात्मन्यविविक्तमङगः ।
निवर्तते तत्पुनरीक्षयैव, न गृह्यते नापि विसृज्य आत्मा ॥३३॥
संसार तो पूर्वदशे । अति अतर्क्य मायावशें ।
शुद्ध वस्तु बहुधा भासे । गुणकर्मविन्यासें बहुरुप ॥७६॥
नाम रुप व्यक्ति वर्ण । कुळ गोत्र क्रियाचरण ।
यापरी प्रपंच भिन्न । सत्य अज्ञान मानिती ॥७७॥
प्रपंच वस्तूच्या ठायीं अध्यस्त । यालागीं वस्तु तद्रूप भासत ।
स्फटिक नानारंगीं अलिप्त । परी संबंधें भासत तद्रूप ॥७८॥
जग पाहतां यापरी । भिन्न भासे अज्ञानें करीं ।
तेणें आत्मा म्हणती विकारी । नर अविचारी अज्ञानें ॥७९॥
त्या अज्ञानाची होय निवृत्ती । तैं साधकां माझी सुलभ प्राप्ती ।
यालागीं माझी निजभक्ती । म्यां यथानिगुतीं प्रकाशिली ॥४८०॥
साधकांचा निजस्वार्थ । जेणें शीघ्र होय हस्तगत ।
यालागीं सर्वभूतीं भगंवत । हा म्यां निजगुह्यार्थ प्रबोधिला ॥८१॥
हें धरोनियां अनुसंधान । भावें करितां माझें भजन ।
तेथ मावळे मीतूंपण । अविद्येसीं अज्ञान समूळ मिथ्या ॥८२॥
तेथ दृश्य-द्रष्टा-दर्शन । त्रिगुणेंसीं कार्यकारण ।
नुरेचि प्रपंचाचें भान । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥८३॥
तेथ नाम रुप गुण जाती । नाहीं महाभूतें भूतव्यक्ती।
चैतन्य पूर्ण सहजस्थिती । ब्रह्मीं ब्रह्मस्फूर्ती असेना ॥८४॥
तें उंच ना ठेंगणें । मोठें ना रोड होणें ।
उजू ना वांकुडेपणें। असों नेणे विकारी ॥८५॥
तेथ शीत ना उष्ण । मृदु ना कठिण ।
कडू ना गोडपण । सुखदुःखेंवीण निर्द्वंद्व ॥८६॥
तेथ भेद ना अभेद । बोलतें ना निःशब्द ।
शाहणें ना मुग्ध । देखणें ना अंध चिद्रूपपणें ॥८७॥
तें एथें ना तेथें । येतें ना जातें ।
जवळी ना परतें । सदोदित स्वतःसिद्ध ॥८८॥
तें खातें ना न खातें । तें घेतें ना देतें ।
जीतें ना मरतें । परादिपर तें परात्पर ॥८९॥
तें बद्ध ना मुक्त । नित्य ना अनित्य ।
क्षोभे ना प्रसन्न होत । वस्तु सदोदित सद्रूपत्वें ॥४९०॥
तेथ पाप ना पुण्य । आकार ना शून्य ।
सगुण ना निर्गुण । स्वानंदें पूर्ण सुखरुप ॥९१॥
सर्वभूतीं भगवद्भजन । करुनि माझे भक्तजन ।
माझें निजरुप परिपूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥९२॥
त्यांसी संत म्हणोनि कांहीं घेणें । अथवा असंत म्हणोनि सांडणें ।
हें नुरेचि त्यांसी वेगळेपणें । ब्रह्मीं ब्रह्मपणें परिपूर्ण ॥९३॥
बद्धकाळीं बद्धता । आत्मेनि घेतली नाहीं तत्त्वतां ।
अथवा मुक्तकाळींची मुक्तता । आत्मा सर्वथा स्पर्शेना ॥९४॥
आत्मा अविकारी पाहीं । येणें निरुपणें पडे ठायीं ।
जरी म्हणशी कळलें नाहीं । ऐक तेंही सांगेन ॥९५॥
आत्मा सर्वदा नित्य पाहीं । यालागीं त्यासी उत्पत्ति नाहीं ।
’उत्पत्ति’ न लगे ज्याचे ठायीं । तो गर्भासी कंहीं स्पर्शेना ॥९६॥
गर्भजन्म ज्यासी नाहीं । त्यासी देहाचा अभाव पाहीं ।
देहेंवीण ’वृद्धि; कंहीं । त्याचे ठायीं स्पर्शेना ॥९७॥
जो सर्वदा विदेही । कर्म न रिघे त्याच्या ठायीं ।
कर्मेंवीण बद्धता पाहीं । आत्म्यासी कंहीं लागेना ॥९८॥
जो निरवयव साचार । त्यासी एकही न घडे संस्कार ।
ज्यासी नाहीं आकार । त्यासी विकार स्पर्शेना ॥९९॥
जो गर्भजन्माअतीत । मरण रिघों न शके तेथ ।
काळाचाही न लगे घात । क्षयातीत परमात्मा ॥५००॥
न लगे जन्म कर्म मरण । त्यासी विकारी करी कोण ।
वस्तु अविकारी परिपूर्ण । यापरी जाण उद्धवा ॥१॥
निबिड दाटल्या अज्ञान । आत्मा नाहीं न करवे जाण ।
प्रखर झालियाही ज्ञान । आत्मा नवा जाण नुपजवे ॥२॥
ज्ञानाज्ञानीं अलिप्त । आत्मा निर्विकार नित्य ।
येचि अर्थी सदृष्टांत । असे सांगत श्रीकृष्ण ॥३॥