श्लोक २२ वा
विषयाभिनिवेशेन नात्मानं वेद नापरम् ।
वृक्षजीविकया जीवन् व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन ॥२२॥
एवं विषयांचे आसक्तीं । तमागुणें वृत्ती ।
तेव्हा एकीहि स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हें चित्तीं स्फुरेना ॥२२॥
ऐसा भ्रमें भुलला प्राणी । जैसा उन्मत्त मदिरापानी ।
त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मनीं पडिला ॥२३॥
कां विषमसंधीज्वरु । तेणें ज्वरें हुंबरे थोरु ।
त्यासी नावडे आपपरु । वृथा विकारु बडबड करी ॥२४॥
फाटां फुटलियावरी । भलतेंचि स्मरण करी ।
तया नाठवे कांहीं ते परी । प्राणी अघोरीं पडले जाण ॥२५॥
कां झालिया भूतसंचार । प्राणी हुंबरें हुंहुंकार ।
पडिला चित्तासी विसर । म्हणे मी कुकर म्हणोनि भुंके ॥२६॥
ऐसें जीविके नेणोनि प्राणी । घाबरे जैसा स्वप्नीं ।
म्हणे मी पडलों रणीं । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥२७॥
तैशी भुली लटकी भुलवणी । काममोहें व्यापिले प्राणी ।
जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणीं वेडावले ॥२८॥
मुक्यानाकीं भरे मुरकुट । तें फेंफें बें बें करी निकृष्ट ।
न कळे रडे करी हाहाट । ते खटपट वाउगी ॥२९॥
तैसे दुःखबळें प्राणी । परी न कळे उंच करणी ।
पडिले मोहमदें भुलोनी । मुकपणीं बेंबात ॥२३०॥
अहंकृतीचा उभारा । शरीरीं भरलासे वारा ।
तो होऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अंधकूपीं ॥३१॥
कां तेलियाचा ढोर पाहीं । डोळां झांपडी स्वदेहीं ।
अवघा वेळ चाले परी पाहीं । पंथ कांहीं न ठकेचि ॥३२॥
भवंता फिरे लागवेगीं । परी पाहतां न लगे आगी ।
घाणियाचि भोंवतें वेगीं । भोवंडी अंगीं जिराली ॥३३॥
तैसे विषय भवंडित भवु । परी नकळेचि विधिमावु ।
जैसा सर्प भ्रमला लागे धांवूं । तैसे विषय आघवे धावंति ॥३४॥
अंवसेचें काळे गडद । तैसा जड मूढ झाला स्तब्द ।
स्फुरेना आप पर हा बोध । जगदांध्य वोढवलें ॥३५॥
जेंवी लोहकाराची भाती । तेवीं वृथा श्वासोच्छ्वास होती ।
वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेलीं ॥३६॥
सकामासी स्वर्गप्राप्ती । म्हणसी बोलिली असे वेदोक्ती ।
तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रतीं सांगेन ॥३७॥