श्लोक ३३ वा
एवं विमृश्य गुणतो मनसस्त्र्यवस्था । मन्मायया मयि कृता इति निश्चितार्थाः ।
सञ्छिद्य हार्दमनुमानसदुक्तितीक्ष्ण । ज्ञानासिना भजत माखिलसंशयाधिम् ॥३३॥
म्यां सांगीतल्या ज्या युक्ती । ज्या कां श्रुतिशास्त्रार्थसंमती ।
त्या विचारोनि परमार्थगतीं । संसारगुंतीं उगवावी ॥१॥
संसारगुंतीसी कारण गुण । गुणावस्थीं व्यापिलें मन ।
त्यासी माझी माया मूळ जाण । जिया केलें आवरण माझेंचि ॥२॥
माझी माया माझेनि सबळ । त्या मजचि आवरिलें तत्काळ ।
जैसें डोळ्याचें डोळां जळ । गोठूनि पडळ होऊनि ठाके ॥३॥
कां पूर्णचंद्र अतिनिर्मळ । तेथ पृथ्वी बिंबली सकळ ।
तेणें सलांछन चंद्रमंडळ । लोक सकळ देखती ॥४॥
पृथ्वीचंद्रासी अंतर । विचारितां दूरांतर ।
मिथ्या बाधिला रजनीकर । ते लोक साचार मानिती ॥५॥
यापरी माया माझ्या ठायीं । आतळली नाहीं कंहीं ।
मिथ्याभासें लोक पाहीं । तिच्याठायीं भूलले ॥६॥
तेणें नाथिली गुणावस्था । अहंकर्तृत्वें घेतली माथां ।
तेणें विषयभोगअवस्था । वासनायुक्ता वाढविल्या ॥७॥
एवं उभय देहबंधन । मिथ्या जीवत्वें लागलें जाण ।
त्याचें करावया छेदन । माझ्या युक्ती जाण विवराव्या ॥८॥
करितां युक्तींचें अनुमान । तेणें अनुमानिक होय ज्ञान ।
न तुटे अविद्याबंधन । यालागीं साधुसज्जन सेवावे ॥९॥
साधूंमाजीं साधुत्व पूर्ण । सेवावे सद्गुरुचरण ।
तेणें निरसे भवबंधन । साधुसज्जन सद्गुरु ॥५१०॥
त्या साधूंचिया सदुक्ती । श्रुत्यर्थें उपदेश करिती ।
तेणें होय ज्ञानखड्ग प्राप्ती । जे बुद्धीच्या हातीं हातवशी ॥११॥
तेंही वैराग्यनैराश्यसाहाणे । लावूनि सतेज शस्त्र करणें ।
धृतीच्या धारणा दृढ धरणें । सावधपणें निःशंक ॥१२॥
शस्त्रासी आणि आपणा । एकपणाची धारणा ।
दृढ साधूनि साधना । देहाभिमाना छेदावें ॥१३॥
जो सकळ संशयाचा कंदू । जेणें देहदुःखाचा उद्बोधू ।
ज्याचेनि सदा विषयसंदू । जो कामक्रोधपोषकू ॥१४॥
जो वाढवी तिनी गुण । जो शुद्धासी आणी जीवपण ।
ज्याचेनि जीव जन्ममरण । दुर्निवार जाण लागलें ॥१५॥
जो सकळ अनर्थांचा दाता । ज्याची लडिवाळ कन्या ममता ।
तियेसी वाढवी माया माता । तिच्या सत्ता हा दाटुगा ॥१६॥
तेथें शस्त्राचेनि लखलखाटें । राहोनियां नेटेंपाटें ।
समरांगणीं सुभटें । घावो येणें नेटें हाणावा ॥१७॥
एकेचि घायें जाण । माया ममता अभिमान ।
त्रिपुटीचें होय छेदन । येणें बळें जाण छेदावा ॥१८॥
भोग्य भोगू भोक्ता । कर्म कार्य कर्ता ।
ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी तत्त्वतां छेदावी ॥१९॥
अहं कोहं सोहं स्वभावो । हाही छेदूनि अहंभावो ।
साधकां निजपदीं ठावो । ब्रह्म स्वयमेवो होऊनि ठेले ॥५२०॥
म्हणाल सांगतां जो प्रकारू । तो शब्दज्ञान वेव्हारू ।
बोलाचा कडकडाट थोरू । कैसेनि अहंकारू मारवे ॥२१॥
शब्दमात्रें अभिमान । जरी पावता निर्दळण ।
तरी कां पां विद्वज्जन । अभिमानमग्न होताती ॥२२॥
अभिमान संमुख दिसता । तरी धांवोनि करूं ये घाता ।
तो अतर्क्य जी सर्वथा । शब्दें अहंता मरेना ॥२३॥
घडे अपरोक्षसाक्षात्कारू । तो शब्दमात्रें नव्हे प्रकारू ।
ऐसा आशंकेचा विचारू । ऐक निर्धारू सांगेन ॥२४॥
जो अनन्यभावें माझें भजन । सर्वदा करी सावधान ।
कां सद्गुरूचे श्रीचरण । मद्भावें जाण जो सेवी ॥२५॥
मज आणि सद्गुरुमूर्ती । भेद नाहीं गा कल्पांतीं ।
येणें अभेदभावें जे भजती । ते ज्ञान पावती सहजचि ॥२६॥
त्यांसी स्वभावें भजनस्थिती । ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।
सहजेंचि सांपडे हातीं । ज्या शस्त्रदीप्ति काळू कांपे ॥२७॥
ज्या शस्त्राच्या धाकाभेण । माया ममता अभिमान ।
सांडूनियां जीवपण । समूळ जाण पळालीं ॥२८॥
हाणावया पुरता घावो । अहंममतेसी नाहीं ठावो ।
अविद्येचाही अभावो । आपभयें पहा हो आपणचि ॥२९॥
सद्भावें जें माझें भजन । करितां एवढें होय ज्ञान ।
येथ आशंका करील मन । कोठें भजन करावें ॥५३०॥
तुझें स्वरूप अतर्क्य जाण । अतिसूक्ष्म आणि निर्गुण ।
तुज भजावया कवण स्थान । आम्हांसी जाण कळेना ॥३१॥
ऐसें कल्पील जरी मन । तरी ऐक सावधान ।
अतिसुगम भजनस्थान । मी सांगेन तें ऐक ॥३२॥
नुल्लंघितां पर्वतकोटी । न रिघतां गिरिकपाटीं ।
दूरी न करितां आटाटी । जे स्थानीं भेटी सदा माझी ॥३३॥
भजनस्थान निरुपम । जेथ मी वसें पुरुषोत्तम ।
प्राप्तीलागीं अतिसुगम । विश्रामधाम भक्तांचें ॥३४॥
सर्व सुखांचा आराम । निजहृदयीं आत्माराम ।
सर्वदा असे सम । भजावें सप्रेम ते ठायीं ॥३५॥
आदि ब्रह्मा अंतीं मशक । सर्वांचे हृदयीं मीचि एक ।
ऐसें पाहे तो सभाग्य देख । हें भजन चोख मत्प्राप्ती ॥३६॥
ज्या मज हृदयस्थाचे दीप्ति । मनबुद्ध्यादिकें वर्तती ।
ज्या माझिये स्फुरणस्फूर्ती । ज्ञानव्युत्पत्ती पायां लागे ॥३७॥
त्या मज हृदयस्थाच्या ठायीं । भजनशीळ कोणीच नाहीं ।
शिणतां बाह्य उपायीं । जन अपायीं पडताती ॥३८॥
ऐशांत सदैव कोणी एक । निजभाग्यें अत्यंत चोख ।
मज हृदयस्थाचा विवेक । करूनि निष्ठंक मद्भजनीं ॥३९॥
करितां हृदयस्थाचें भजन । माझें पावे तो निजज्ञान ।
वैराग्ययुक्त संपूर्ण । जे ज्ञानीं पतन रिघेना ॥५४०॥
ज्या ज्ञानाभेणें जाण । धाकेंचि पळे अभिमान ।
तें मी आपुलें त्यांसी दें ज्ञान । जे हृदयस्थाचें भजन करिती सदा ॥४१॥
ज्या ज्ञानाचिये ज्ञानसिद्धी । अखिल जाती आधिव्याधी ।
संशय पळती त्रिशुद्धी । भक्त निजपदीं पावती ॥४२॥
सबळ बळें सुभटें । शस्त्राचेनि लखलखाटें ।
संशयो छेदावा कडकडाटें । हें म्यां नेटेंपाटें सांगीतलें ॥४३॥
यावरी ऐसें गमेल चित्तीं । संसाराची सत्यप्राप्ती ।
त्यासी शस्त्र घेऊनि हातीं । कोणे युक्तीं छेदावा ॥४४॥
तरी संसार तितुकी भ्रांती । हेंचि सांगावया दृष्टांतीं ।
पुढील श्लोकाची श्लोकोक्ती । स्वयें श्रीपती सांगतू ॥४५॥