श्लोक १६ वा
एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः ।
कालावयवतः संति भावा जन्मादयोऽसकृत् ॥१६॥
म्हणें आइकें बापा उद्धवा । हा मिथ्या मतवादु आघवा ।
म्हणसी कैसेनि जाणावा । विवेक करावा मतांचा ॥४२०॥
निवृत्ति ते केवळ कष्ट । म्हणती प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
प्रवृत्तीमाजीं परम कष्ट । मरण अरिष्ट अनिवार ॥२१॥
धरोनियां जन्ममूळ । अखंड लागलासे काळ ।
लवनिमिष पळपळ । काळ वेळ साधित ॥२२॥
जैसें संवचोराचें साजणें । तैसें काळाचें जोगवणें ।
वेळ आल्या जीवेंप्राणें । नाहीं राखणें सर्वस्वें ॥२३॥
काळु न म्हणे हाट घाट । न म्हणे अवसी पहांट ।
न म्हणे देश विदेश वाट । नाशी उद्भट निजतेजें ॥२४॥
करितां प्रवृत्तीचे कष्ट । अवचितां मृत्यूचा चपेट ।
अंगीं वाजे जी उद्भट । अहा कटकट ते काळीं ॥२५॥
जीवीं वासनेच्या थोर हांवा । म्हणे गेलों मेलों धांवा पावा ।
कोण निवारी मृत्युप्रभावा । उपावो तेव्हां चालेना ॥२६॥
काळु मारोनि नोसंडी । यातना भोगवी गाढी ।
सवेंचि गर्भवासीं पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥२७॥
मातेच्या जठरकुहरीं । विष्ठामूत्रांच्या दाथरीं ।
अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठाराग्नी ॥२८॥
विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोंडीं कृमी किडे ।
गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढें सांगेल ॥२९॥
कट्वम्ललवणमेळें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।
त्वचेवीण गर्भांग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥
ते गर्भोदरींची व्यथा । नेणती माता आणि पिता ।
तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥३१॥
ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दावूं नये दिठी ।
ते योनिद्वारें अतिसंकटीं । जन्म शेवटीं जीवासी ॥३२॥
जे नित्य मूत्राची न्हाणी । कीं नविया नरकाची खाणी ।
जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥३३॥
अपवित्र विटाळशीचें रुधिर । तें गोठोनि झालें जी शरीर ।
निंद्यद्वारें जन्मोनि नर । आम्ही पवित्र म्हणविती ॥३४॥
गर्भावासाहूनि गाढें । दुःख कोण आहे पुढें ।
मतवादी बोले तें कुडें । सुख नातुडे प्रवृत्तीं ॥३५॥
एके जन्में जन्म न सरे । एकें मरणें मरण नोसरे ।
कोटि कोटि जन्मांचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥३६॥
पुढतीं जन्म पुढतीं मरण । अनिवार लागलें जाण ।
प्रवृत्तीमाजीं सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥३७॥
जन्ममरणांमाजिले संधी । आणिकही थोर दुःख बाधी ।
त्या दुःखाची दुःखसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥३८॥
धाडीभेणें पळतां थोर । आडवे नागवती चोर ।
तैसें जन्ममरणांचें अंतर । षड्विकार राखती ॥३९॥
षड्विकारांच्या पतिव्रता । षडूर्मी लागल्या जीविता ।
एवं प्रवृत्तीमाजीं परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥४४०॥
कर्मवादियांच्या मतां । जीवु स्वतंत्र कर्मकर्ता ।
म्हणती ते मिथ्या वार्ता । परतंत्रता प्रत्यक्ष ॥४१॥